रत्नागिरीतील घरकुले लाभार्थ्यांना कायमस्वरूपी देण्याची मागणी
रत्नागिरी, 23 ऑगस्ट (हिं.स.) । रत्नागिरी शहरातील विश्वनगर येथील एकात्मिक शहर विकास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली घरकुले सध्या वास्तव्यास असलेल्या मूळ लाभार्थ्यांच्या नावे कायमस्वरूपी करण्याची मागणी भाजपा शहर सरचिटणीस नीलेश आखाडे यांनी प्रदेशाध्यक्ष
विश्वनगरमधील घरांच्या हस्तांतरासंदर्भात निवेदन


रत्नागिरी, 23 ऑगस्ट (हिं.स.) । रत्नागिरी शहरातील विश्वनगर येथील एकात्मिक शहर विकास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली घरकुले सध्या वास्तव्यास असलेल्या मूळ लाभार्थ्यांच्या नावे कायमस्वरूपी करण्याची मागणी भाजपा शहर सरचिटणीस नीलेश आखाडे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.

भाजपाच्या सेवा अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांना गती देण्यासाठी विविध विषयांचा पाठपुरावा सुरू आहे. आमदार प्रमोद जठार आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक संतोष साखरे यांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न संबंधित पातळीवर मांडले जात आहेत. विश्वनगर येथील एकात्मिक शहर विकास योजनेतील घरकुलांचे तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले होते. मात्र त्यानंतर पालिकेने वेळोवेळी घेतलेल्या विविध ठरावांमुळे गेल्या २५ वर्षांपासून ही घरकुले लाभार्थ्यांच्या नावे होऊ शकलेली नाहीत.

पालिकेने २० ऑक्टोबर २०२१च्या ठरावान्वये ही घरकुले सफाई कर्मचाऱ्यांना आंबेडकर आवास योजनेतून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एकात्मिक शहर विकास योजनेतील पूर्वीचे काही लाभार्थी त्यांच्या घरकुलापासून वंचित होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सध्या घरकुलांमध्ये वास्तव्यास असलेले लाभार्थी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा विचार करून सर्वसमावेशक निर्णय घेतल्यास कोणालाही घरकुलापासून वंचित राहावे लागणार नाही. शासनाच्या ‘सर्वांसाठी घर’ या उद्देशाला अनुसरून सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली.

यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबारातही हा प्रश्न मांडण्यात आला होता. त्यावेळी या प्रकरणी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे आखाडे यांनी सांगितले. मात्र त्यावर काही झाले नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande