
नाशिक, 23 ऑगस्ट (हिं.स.)।
जिल्हा परिषद नाशिक आणि विनोबा ॲप–ओपन लिंक्स फाउंडेशन (OLF) यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव, शैक्षणिक नवोपक्रमांची देवाणघेवाण आणि शिक्षक–अधिकारी संवादाला बळ देण्यासाठी ‘शिक्षण उत्सव २०२६’चे आयोजन नाशिक करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी, DIET चे अधिव्याख्याता डॉ. बाबासाहेब बडे, विविध तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना आदर्श शाळा घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थीकेंद्रित अध्यापन, स्वच्छ व सुरक्षित शालेय वातावरण, लोकसहभाग तसेच शिक्षकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील चांगले कार्य अनेकदा शाळा वा केंद्रस्तरापर्यंत मर्यादित राहते. अशा कार्याची जिल्हास्तरावर दखल घेऊन त्याची व्यापक देवाणघेवाण व्हावी, शिक्षकांना प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या योगदानाला योग्य व्यासपीठ मिळावे, हा शिक्षण उत्सवामागील प्रमुख उद्देश होता.
नाशिक जिल्ह्यात ३,२६४ शाळा आणि ११,८०८ शिक्षक व मुख्याध्यापक विनोबा उपक्रमाशी जोडले गेले असून, शिक्षकांनी विविध शैक्षणिक उपक्रम व नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींच्या ३३ हजारांहून अधिक पोस्ट्सच्या माध्यमातून देवाणघेवाण केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI