
यवतमाळ, 23 ऑगस्ट (हिं.स.) गेल्या दहा दिवसांपासून उघडीप घेतलेल्या वरुणराजाने अखेर शनीवारी रात्री जिल्ह्याभरात हजेरी लावली. या पावसामुळे थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला. कोमेजू लागलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. परंतु शेतक-यांवर अद्यापही चिंतेचे सावट कायम आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुरवातीपासून पावसाचा लपंडाव सुरू आहे. समाधानकारक पावसानंतर शेतकर्!यांनी पेरण्या आटोपून घेतल्या. परंतु, पावसाची दडी शेतक-यांची चिंता वाढविणारीच म्हणावी लागेल. कोरडवाहू शेतीतील कापूस, सोयाबीन, तूरीसह अन्य पिके संकटात सापडली होती. अनेक ठिकाणी जमिनीत ओलावा कमी झाल्याने पिके करपू लागली. यंदा पावसाच्या लहरीपणामुळे जुलै अखेरपर्यंत शेतकर्!यांच्या पेरण्या सुरूच होत्या. विशेष म्हणजे काही तालुक्यात सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकरी पार खचून गेला आहे. जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. या प्रकरणी पोलिस ठाण्यात कंपन्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. परंतु शेतक-यांच्या हातून पूर्ण हंगाम निसटून गेला आहे. आता शिल्लक पेरण्यांसाठी मुबलक पाऊस कोसळणे गरजेचे होते. मात्र, पावसाचा खेळ आताही सुरूच आहे. जुलै महिन्याच्या शेवटी जिल्ह्यात १३५ मिमी पाऊस कोसळला. तब्बल ३५ हजारांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तद्नंतर तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. परंतु गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पुन्हा पिके करपू लागले होते. अशात शुक्रवारी मध्यरात्री जिल्ह्यात सर्वदूर वरुणराजा बरसला. या पावसामुळे पिकांची अवस्था थोडीफार चांगली झाली आहे. परंतु दमदार पावसाची प्रतीक्षा शेतक-यांसह सर्वसामान्यांना आहे.
जलाशयात ७४ टक्के साठा
जिल्ह्यातील छोटे, मध्यम आणि मोठे, असा मिळून ७३ धरण, प्रकल्पात ७३.६० टक्के जलसाठा आहे. जुलै महिन्याच्या शेवटी कोसळलेल्या पावसामुळे धरणातील जलसाठ्याची अवस्था चांगली आहे. परंतु मागिल चार वर्षाच्या तुलनेत जलसाठा कमी असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा शेतक-यांसह सर्वसामान्यांना आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी