
कोल्हापूर, 23 ऑगस्ट (हिं.स.)। शिरोली एमआयडीसी जवळील नागाव गावच्या हद्दीत असलेल्या छ. संभाजीनगर येथे असलेल्या एका प्लास्टिक स्क्रॅपच्या गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट आसमंतात पसरल्याने परिसरात घबराहट पसरली. कोल्हापूरसह परिसरातील शहरातून अग्नीशामक दलाला पाचारण करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत अंदाजे 35 लाखांचे साहित्य आणि आणि इमारतीसह इतर साहित्य मिळून 50 लाखाहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
याबाबत घटना स्थळावरून आणि ग्राम महसूल अधिकारी नागाव यांचेकडून मिळालेली अधिक माहिती अशी नागाव येथील राकेश राजाराम कोळी आणि रघुनाथ राऊ समडोळे यांचे गट क्रमांक 475 मध्ये जावेद मोमीन व परवेज रफीक सोबरे यांचा स्क्रॅप गोडाऊन असून आज 23 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 च्या दरम्यान भीषण आग लागली असून मोमीन यांचे 50-55 टन प्लास्टिक स्क्रॅपचे अंदाजे 20-25 लाखाचे नुकसान झाले आहे आणि परवेज सोबरे यांचे 30-35 टन स्क्रॅप असून अंदाजे 8-10 लाखाचे नुकसान झाले आहे. सहारा वेस्ट प्लास्टिक नावाच्या स्क्रॅप गोडाऊन सह शेजारी असलेल्या एका केमिकल कंपनीतील साहित्य आगीत जळून भस्मसात झाले. आगीचे नेमके कारण समजून आले नाही. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar