
परभणी, 23 ऑगस्ट, (हिं.स.)। गंगाखेड तालुका काँग्रेस पक्षाची पक्षबांधणी व नवीन कार्यकारिणी निवड बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत तालुक्यात काँग्रेस पक्षाची संघटना अधिक सक्षम करण्यासाठी गावागावात पक्षाची भूमिका आणि विचार पोहोचविण्या बरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविण्याची गरज कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक व जनहिताच्या प्रश्नांवर आंदोलने उभारण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. तसेच पक्षाच्या संघटनेत युवकांचा सक्रिय सहभाग वाढवून त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश पवार यांनी काँग्रेस पक्षाला पुनर्जीवित व मजबूत करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटनात्मक बांधणी केली जाईल. पक्षाच्या वाढीसाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी भविष्यात आवश्यक त्या ठिकाणी संघर्ष करण्याची तयारी ठेवली जाईल, शहराध्यक्ष शेख युनुस यांनी सांगितले.
दरम्यान, चंद्रशेखर साळवे यांची काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गंगाखेड तालुका काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या निवडीबद्दल उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष सुनील पौळ यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश झाला.
बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष मुंडे, शहराध्यक्ष शेख युनूस, युवा काँग्रेसचे सिद्धोधन भालेराव, आमानुल्ला खान काका, डॉ. शैलेश कदम, वामन ढोबळे, सुरेश इखे, संदीप जाधव, ॲड. लक्ष्मण केंद्रे, सुभाष शिंदे, रितेश मोरे, अनिल मुंडे, शेख अज्जू, अजीम खान, शिवाजी कांबळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis