
वर्धा, 23 ऑगस्ट (हिं.स.)। सक्तीच्या स्मार्ट मीटरच्या विरोधात सोमवारी (ता. २४) हिंगणघाट शहरात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चाचे आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार अमर काळे, युवा नेते सलील देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे. या मोर्च्यात नागरिक, शेतकरी, व्यापारी, कामगार तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सर्वसामान्य वीज ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता असून, वीज बिलांबाबत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्यामुळे सक्तीने स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मोर्चापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जनआक्रोश सभा, त्यानंतर मोर्चाला सुरुवात होणार आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून स्मार्ट मीटरची सक्ती थांबविण्याची मागणी करण्यात येणार आहे. स्मार्ट मीटरची सक्ती बंद करा, सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा द्या, अशी मागणी करत मोठ्या संख्येने नागरिकांनी या जनआक्रोश मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक राष्ट्रवादीचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी