लातूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापूर्वी स्वातंत्र्यसैनिकांचे नामफलक लावण्याचे आदेश
लातूर, 23 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर येथील शिव छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालयाच्या शेजारी असलेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारकाच्या दर्शनी भागात स्थानिक स्वातंत्र्यसैनिकांच्या नावांचे फलक (शक्य असल्यास फोटोंसह) येत्या १७ सप्टेंबर २०२६ पूर्वी
निवेदन


लातूर, 23 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर येथील शिव छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालयाच्या शेजारी असलेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारकाच्या दर्शनी भागात स्थानिक स्वातंत्र्यसैनिकांच्या नावांचे फलक (शक्य असल्यास फोटोंसह) येत्या १७ सप्टेंबर २०२६ पूर्वी उभारण्यात यावेत, अशी मागणी स्वातंत्र्यसैनिकांचे नातू दीपक गंगणे यांनी विभागीय आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची दखल घेत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी उपस्थित लातूर शहर महानगरपालिका आयुक्तांना १७ सप्टेंबरपूर्वी हे नामफलक लावण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

भारत देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले असले, तरी निजामांच्या जुलमी राजवटीमुळे मराठवाडा मुक्तीचा लढा पुन्हा पुकारावा लागला होता. अनेक वीरांच्या बलिदानानंतर आणि संघर्षातून १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामांच्या तावडीतून मुक्त झाला. या प्रेरणादायी लढ्यातील प्रमुख नेत्यांचा इतिहास ज्ञात असला, तरी स्थानिक पातळीवर लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांची माहिती आणि नावे पुढील पिढीला सहजासहजी उपलब्ध होत नाहीत.

या संदर्भात दीपक गंगणे यांनी नमूद केले की, स्थानिक स्वातंत्र्यसैनिकांचे नाव व इतिहास नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी ते ३१ जुलै २०१५ पासून, म्हणजे गेल्या १० वर्षांपासून लातूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. इतका प्रदीर्घ काळ पाठपुरावा करूनही अद्याप सकारात्मक कारवाई न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

दीपक गंगणे यांनी विभागीय आयुक्तांशी सकारात्मक चर्चा करून हे निवेदन सादर केले. निवेदनाची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी यंदाच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबरपूर्वी स्मारकाच्या परिसरात स्वातंत्र्यसैनिकांच्या नावांचे फलक लावण्याच्या सूचना मनपा प्रशासनाला दिल्या आहेत. या निर्णयामुळे गेल्या दशकाभरापासून प्रलंबित असलेल्या मागणीला यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande