
कुंभमेळा युवकांसाठी सामाजिक सहभाग, नेतृत्व आणि करिअरची मोठी संधी
नाशिक, 23 ऑगस्ट (हिं.स.)।
आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून नाशिकच्या सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक, आर्थिक आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या कुंभमेळ्यात महाविद्यालयीन युवकांना मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याची संधी असून, युवा शक्ती, सोशल मीडिया आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यंदाचा कुंभमेळा विशेष ठरणार आहे, असे प्रतिपादन नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती, हिरे नॉलेज कॅम्पस, नाशिक यांच्या वतीने आयोजित ‘नाशिक कुंभ सेल उद्बोधन कार्यक्रम’ प्रसंगी ते बोलत होते. लोकनेते व्यंकटराव हिरे ऑडिटोरियम, के.बी.एच. डेंटल कॉलेज येथे हा कार्यक्रम झाला.
यावेळी आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, आगामी कुंभमेळा हा नाशिकच्या भविष्यातील सांस्कृतिक जडणघडण आणि इतिहासाचा सुंदर संगम ठरणार आहे. कुंभमेळा ही भारतीय संस्कृती, अध्यात्म, श्रद्धा आणि परंपरेची समृद्ध परंपरा जगासमोर मांडणारी एक अनोखी पर्वणी आहे. संत-महंत, साधू-संत आणि लाखो भाविकांच्या सहभागातून अध्यात्मिक वातावरणाची अनुभूती देणारा हा सोहळा नव्या पिढीला आपल्या संस्कृती व परंपरेशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम ठरेल. कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिक शहरासह जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून, पाणी, रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने दीर्घकालीन विकासाला दिशा मिळेल.
कुंभमेळा व्यवस्थापनामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून, युवकांनी स्वयंसेवक म्हणून तसेच विविध व्यवस्थापन क्षेत्रांत सक्रिय सहभाग घ्यावा. या अनुभवाचा विद्यार्थ्यांच्या भविष्यातील करिअरलाही मोठा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अपूर्व हिरे म्हणाले की, नाशिकचा कुंभमेळा हे मुख्यमंत्री महोदयांच्या विकासाच्या व्हिजनचे प्रतिबिंब असून, नाशिकच्या विद्यार्थ्यांना कुंभमेळा व्यवस्थापनात सहभागी होण्याची मिळणारी संधी त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांना मोठ्या स्तरावरील नियोजन, व्यवस्थापन आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव या माध्यमातून मिळणार आहे.
विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता सामाजिक उपक्रम, स्वयंसेवा आणि शहराच्या विकासाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा. कुंभमेळ्यासारख्या व्यापक आयोजनातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना, टीमवर्क आणि सामाजिक बांधिलकी विकसित होण्यास मदत होईल. नाशिकचा विकास ही केवळ शासन व प्रशासनाची जबाबदारी नसून, त्यामध्ये युवकांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.
कुंभमेळा हा नाशिकच्या युवकांसाठी आपल्या ज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा आणि कौशल्यांचा सकारात्मक वापर करण्याची मोठी संधी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नाशिकची सकारात्मक ओळख देश-विदेशात पोहोचविण्यात युवक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व असलेल्या या सोहळ्यात काम करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना भविष्यात सामाजिक, प्रशासकीय तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांत निश्चितच उपयोगी ठरेल, असे डॉ. हिरे यांनी सांगितले.
कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे विश्वस्त डॉ. बी. एस. जगदाळे यांनी केली. त्यांनी ‘कुंभ सेल’ आणि ‘कुंभ इंडक्शन प्रोग्राम’ची माहिती देत विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे तहसीलदार मा. मकरंद दिवाकर, संस्थेचे विश्वस्त डॉ. प्रदीप जी. एल., डॉ. संतोष तांबे, डॉ. बी. एस. यादव, शामकांत भंडारी, हरीश निकम, प्रतीक काळे, संजय कुंदे आदी मान्यवर उपस्थित होते.हिरे नॉलेज कॅम्पसमधील विविध महाविद्यालयांतील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या इंडक्शन प्रोग्रामचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कुंभमेळा नोडल अधिकारी डॉ. प्रकाश शेवाळे यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI