

रायगड, 23 ऑगस्ट (हिं.स.)। रिंग रोडवरील छत्रपती संभाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या भौमितिक आकाराच्या शिल्पावरून सुरू झालेला वाद अद्याप शमण्याचे नाव घेत नसून, या प्रकारामुळे शिवप्रेमी आणि पेणकरांच्या भावना दुखावल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित बांधकाम अभियंता सुहास कांबळे यांचे निलंबन करावे तसेच शिल्पासाठी खर्च झालेला २५ लाख रुपयांचा निधी संबंधितांकडून वसूल करावा, अशी लेखी मागणी त्यांनी पेण नगरपालिका मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याकडे केली आहे.
बेकावडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, पेण शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा शौर्य, त्याग आणि बलिदानाची साक्ष देणारा भव्य व वास्तववादी पुतळा उभारण्याची शिवप्रेमींची अनेक वर्षांपासून मागणी होती. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी, इतिहासकार, शिल्पकार, तज्ज्ञ आणि शिवप्रेमी संघटनांना विश्वासात न घेता भौमितिक आकाराचे शिल्प उभारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दिवसान पूर्वी उभारण्यात आलेल्या या शिल्पाच्या स्वरूपावरून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली. अनावरणानंतर काही तासांतच प्रशासनाला हे शिल्प हटवावे लागल्याचे बेकावडे यांनी निवेदनात नमूद केले आहे. या संपूर्ण प्रकाराची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शिल्पासाठी २५ लाख रुपये खर्च दाखविण्यात आल्याचा आरोप करत या निधीच्या वापराची चौकशी करावी, तसेच आवश्यक असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फतही तपास करावा, अशी मागणी बेकावडे यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई न झाल्यास शिवप्रेमींच्या वतीने पेण नगरपालिका कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)