लातूर अधिकारी मारहाण आणि डीपी रोड प्रकरणात कारवाईच्या घोषणेनंतर सवालांची सरबत्ती
लातूर, 23 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील कथित गैरव्यवहारावरून भाजप आमदार प्रशांत बंब यांनी तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या कार्यकाळावर गंभीर सवाल उपस्थित केले होते. आता हाच मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण सध्य
जी श्रीकांत


लातूर, 23 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील कथित गैरव्यवहारावरून भाजप आमदार प्रशांत बंब यांनी तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या कार्यकाळावर गंभीर सवाल उपस्थित केले होते. आता हाच मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण सध्या विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असलेले जी. श्रीकांत लातूरमध्ये येऊन अधिकारी मारहाण आणि डीपी रोड प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्या कार्यकाळावरच कोट्यवधींच्या कथित गैरव्यवहाराचे आरोप झाले होते, तेच आता लातूरमधील कथित गैरव्यवहार आणि अधिकाऱ्यांवरील आरोपांची चौकशी करून कारवाई करणार का? हा प्रश्न आता लातूरच्या प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

२० कोटींच्या कामांचा आरोप अन् २१ तक्रारी!

छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत प्रशांत बंब यांनी तत्कालीन प्रशासक जी. श्रीकांत यांच्या कार्यकाळातील कामांची चौकशी करण्याची मागणी केली होती. बंब यांच्या आरोपानुसार, महापालिकेच्या ६७(३)(क) या विशेष अधिकाराचा वापर करून सुमारे २० कोटी रुपयांची कामे विनानिविदा करण्यात आली, तसेच अशा कामांबाबत सुमारे २१ तक्रारी असल्याचा दावा त्यांनी केला होता. या आरोपांमुळे श्रीकांत यांच्या कार्यकाळातील प्रशासकीय निर्णय आणि आर्थिक व्यवहारांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

१४.४५ लाखांच्या साहित्य खरेदीनेही उडवली होती खळबळ

आयुक्तांच्या बंगल्यासाठी कथित १४.४५ लाख रुपयांच्या घरगुती साहित्य खरेदीचा मुद्दाही त्यावेळी चांगलाच गाजला होता. बेडशीट, टॉवेल, डिनर सेट, झाडू, साबण, डस्टबिन आदी वस्तूंच्या खरेदीवर बंब यांनी प्रश्न उपस्थित केले होते. बंगल्याच्या दुरुस्तीवरील खर्च, वाहनाच्या पसंतीच्या क्रमांकासाठी सरकारी पैशांचा कथित वापर आणि इतर प्रशासकीय खर्चाबाबतही बंब यांनी चौकशीची मागणी केली होती.

माहिती मिळत नसल्याने सहा तास ठिय्या

महापालिकेकडून मागितलेली माहिती मिळत नसल्याचा आरोप करत बंब यांनी जानेवारी २०२५ मध्ये महापालिकेत तब्बल सहा तास ठिय्या आंदोलन केले होते. त्यामुळे बंब विरुद्ध महापालिका प्रशासन हा संघर्ष त्यावेळी चांगलाच रंगला होता.

श्रीकांतांनी आरोप फेटाळले होते

दरम्यान, घरगुती साहित्य खरेदीच्या आरोपांवर जी. श्रीकांत यांनी आपण त्या वेळी तेथे नव्हतो आणि संबंधित वस्तू आपण मागवलेल्या नसल्याचे स्पष्ट केले होते. अनावश्यक खर्च झाला असल्यास चौकशी केली जाईल, असेही त्यांनी म्हटले होते. म्हणजेच, त्या वेळी आरोप आणि त्यावर स्पष्टीकरण अशी दोन्ही बाजू समोर आली होती.

आता लातूरमध्ये नवी भूमिका!

आता परिस्थिती बदलली आहे. जी. श्रीकांत हे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असून लातूरमधील अधिकारी मारहाण आणि डीपी रोड प्रकरणात लातूरमध्ये येऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर लातूरमधील काही नगरसेवकांनी संबंधित प्रकरणात अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची लाच घेतल्याचे उघडपणे आरोप केल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो

ज्यांच्या कार्यकाळावर यापूर्वी कोट्यवधींच्या कथित गैरव्यवहाराचे आरोप झाले होते, तेच अधिकारी आता लातूरमधील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार? कारवाई निष्पक्ष होणार का? आरोपांची सखोल चौकशी होणार का? की पुन्हा आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगणार? लातूरच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची भाषा होत असताना, पूर्वी स्वतःवर झालेल्या आरोपांबाबतची चौकशी आणि त्याचा निष्कर्ष काय, याचाही खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी आता जोर धरू शकते.

कारण लातूरकरांचा सवाल साधा आहे

“न्यायाचा तराजू सगळ्यांसाठी समान असेल, तर आधीच्या आरोपांचे काय?” आता डीपी रोड आणि अधिकारी मारहाण प्रकरणात नेमकी कोणती कारवाई होते, तसेच नगरसेवकांनी केलेल्या कोट्यवधींच्या कथित लाचखोरीच्या आरोपांची चौकशी कितपत निष्पक्षपणे होते, याकडे संपूर्ण लातूरचे लक्ष लागले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande