
पुणे, 23 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्ह्यातील तरुणांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. पुणे जिल्ह्यात नव्याने ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पात्र आणि इच्छुक व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ आहे.जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायती आणि नागरी भागांमध्ये सध्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ उपलब्ध नाही, अशा ठिकाणी नवीन केंद्रांना मान्यता देण्यात येणार आहे. पात्र अर्जदारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाणार असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि दाखले उपलब्ध करून देण्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे नवीन केंद्रांच्या माध्यमातून संबंधित भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ अधिक सुलभपणे मिळण्यास मदत होणार आहे.इच्छुक पात्र व्यक्तींनी अर्जाची अंतिम मुदत लक्षात घेऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु