
सोलापूर, 23 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्ह्यातील जलसंधारणाच्या सुमारे ५५ कामांमध्ये अनियमितता झाल्याच्या तक्रारींची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश विधिमंडळ अंदाज समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पाझर तलाव आणि पाणी साठवणूक तलावांच्या कामांमध्ये चुकीच्या पद्धतीने काम झाल्याचा मुद्दा समितीसमोर मांडण्यात आला.आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील अंदाज समिती सध्या सोलापूर जिल्ह्यातील विविध विकासकामांची पाहणी करत आहे. समितीने जिल्हा नियोजन समितीच्या ठिकाणी जिल्हा प्रशासन, महापालिका, कृषी, जलसंधारण, जिल्हा परिषद आणि पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.बैठकीत बोगस बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करून शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या प्रकरणांचाही आढावा घेण्यात आला. अशा बोगस लाभार्थ्यांचा शोध घेऊन आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या प्रकरणात काही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याची माहितीही बैठकीत समोर आली.याशिवाय दुभत्या जनावरांची बेकायदेशीर कत्तल आणि अवैध दारूविक्रीविरोधातील कारवाईबाबतही संबंधित विभागांना समितीने जाब विचारला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड