
पुणे, 23 ऑगस्ट (हिं.स.) सौर कृषी ऊर्जेच्या माध्यमातून बारामती परिमंडळातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होत आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत १ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठ्याचा लाभ मिळत असून, ५८ हजार ६८४ शेतकऱ्यांना सौर कृषी पंपांच्या माध्यमातून दिवसा मोफत वीज मिळत आहे.कृषी भार अधिक असलेल्या वीज उपकेंद्रांच्या परिसरात विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प उभारून कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येत आहे. यामुळे शेतीसाठी आवश्यक असलेली वीज दिवसा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना आवर्तन पद्धतीने दिवसा किंवा रात्री वीजपुरवठा केला जात होता.
रात्रीच्या वेळी शेतीपंप सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात जावे लागत असल्याने अनेक अडचणी निर्माण होत होत्या. ही गैरसोय कमी करण्यासाठी दिवसा वीजपुरवठ्याला प्राधान्य देण्यात येत आहे.सातारा मंडळात ४२ सौर प्रकल्प उभारण्यात आले असून, त्यांची एकूण क्षमता १७५ मेगावॅट आहे. हे प्रकल्प ८६१ एकर क्षेत्रावर उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळे ५७ हजार ४३८ शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होत आहे.तर बारामती ग्रामीण मंडळात २२ सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. ४४० एकर क्षेत्रावर उभारलेल्या या प्रकल्पांची एकूण क्षमता १११ मेगावॅट आहे. या प्रकल्पांचा लाभ ३५ हजार ५४१ शेतकऱ्यांना मिळत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु