
सोलापूर, 23 ऑगस्ट (हिं.स.)। सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील बोगस आणि अपात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांची नावे रेशन यादीतून कमी करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने ‘मिशन सुधार’ अभियान हाती घेतले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील तब्बल ७१ हजार ९५६ संशयास्पद व अपात्र लाभार्थी रेशन यादीतून वगळण्यात आले आहेत.आधार डेटाबेस, ई-केवायसी आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील उपलब्ध माहितीची पडताळणी करून ही कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करताना लाभार्थ्यांच्या नोंदी तपासण्यात आल्या.तपासणीदरम्यान उत्पन्नाची निर्धारित मर्यादा ओलांडलेले, प्राप्तिकर भरणारे, चारचाकी वाहनधारक, कंपनी किंवा विविध मंडळांचे संचालक, तसेच मयत, दुबार नोंदणी झालेले आणि दीर्घकाळ रेशन न घेणारे लाभार्थी आढळून आले.तालुकानिहाय पाहता माळशिरस येथे सर्वाधिक १० हजार ८७७ संशयास्पद लाभार्थी आढळले. त्यानंतर माढा येथे १० हजार १५३, बार्शी ९ हजार १६, पंढरपूर ८ हजार १८० आणि अक्कलकोट येथे ६ हजार १८७ लाभार्थी आढळले.वगळण्यात आलेल्यांमध्ये उत्पन्नाची मर्यादा ओलांडलेले ४१ हजार ३१२, दीर्घकाळ धान्य न उचलणारे १३ हजार ९२६, बोगस ५ हजार ४, आधार स्टेटसमध्ये त्रुटी असलेले ३ हजार ९८० आणि कंपनी संचालक ३ हजार ९७ लाभार्थींचा समावेश आहे. याशिवाय मोठी वार्षिक उलाढाल असलेले २ हजार ८९१, १०० वर्षांपेक्षा अधिक वयाचे १ हजार ७६ आणि चारचाकी वाहनधारक ४७३ लाभार्थीही तपासणीत आढळले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड