
तेहरान, 24 ऑगस्ट (हिं.स.)।इराणला मक्का करारात सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तानुसार, सौदी अरेबिया, तुर्किये आणि पाकिस्तान यांनी मिळून हा सुरक्षा करार केला आहे. मात्र, या निमंत्रणाला इराणचे परराष्ट्रमंत्री किंवा सौदी अरेबिया, तुर्किये अथवा पाकिस्तान यापैकी कोणत्याही देशाने अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
इराणच्या संसदेच्या वृत्तपत्राचे प्रमुख मेहदी रहीमी यांनी सांगितले की, इराणला या करारात सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाले असून, या प्रस्तावावर विचार सुरू आहे.रहीमी यांनी सांगितले की, या भागातील देश प्रादेशिक सुरक्षा कवच उभारण्याच्या दिशेने पुढे जात आहेत. त्यांच्या मते, असे पाऊल इराणसाठी फायदेशीर ठरू शकते, कारण तेहरान दीर्घकाळापासून प्रादेशिक सुरक्षा व्यवस्थेची बाजू मांडत आहे.
मक्का करारावर ७ ऑगस्ट रोजी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, तुर्कियेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.या करारानुसार, तिन्ही देशांपैकी कोणत्याही एका देशावर सशस्त्र हल्ला झाल्यास तो तिन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल. तुर्कियेचे परराष्ट्रमंत्री हाकान फिदान यांनी या व्यवस्थेची तुलना नाटोच्या कलम ५शी केली आहे. मात्र, हा करार इराण किंवा अन्य कोणत्याही विशिष्ट देशाविरोधात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तिन्ही सदस्य देश राजनैतिक आणि लष्करी समन्वयाच्या विविध पद्धतींवरही काम करत आहेत. यामध्ये परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांच्या तसेच लष्करी कमांडरांच्या बैठका, संयुक्त लष्करी सराव आणि संरक्षण उद्योगांमध्ये सहकार्य यांचा समावेश आहे. तुर्कियेने भविष्यात या आघाडीचा विस्तार करून इतर देशांनाही त्यात सहभागी करून घेण्याचे संकेत दिले आहेत. इजिप्तचे नाव संभाव्य सदस्य देश म्हणून सार्वजनिकपणे घेण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode