
इस्लामाबाद, 24 ऑगस्ट (हिं.स.)।पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)ने माजी पंतप्रधान आणि पक्षाचे संस्थापक इमरान खान यांच्या आरोग्य तपासणीवरून सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत.इमरान खान यांची सीटी कोरोनरी अँजिओग्राफी शिफा इंटरनॅशनल रुग्णालयात करण्यात यावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.
पीटीआयने आरोप केला आहे की, पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पीआयएमएस)मधील डॉक्टरांनी तपासणीचा सल्ला दिल्यानंतरही ती करण्यात आली नाही. पीटीआयचे केंद्रीय माहिती सचिव शेख वकास अक्रम यांच्या म्हणण्यानुसार, १० ऑगस्ट रोजी सरकारी वैद्यकीय मंडळाने इमरान खान यांची तपासणी केली होती. यापूर्वी, १ ऑगस्ट रोजी पीआयएमएस मधील एका हृदयरोग तज्ज्ञाने इमरान खान यांच्या रक्तदाबातील बदल, अस्वस्थता आणि संभाव्य हृदयविकाराच्या गुंतागुंतीचा धोका लक्षात घेऊन सीटी कोरोनरी अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला होता.
अक्रम यांनी सांगितले की,इमरान खान यांचे वय आणि दीर्घकाळापासून सुरू असलेले एकाकी वास्तव्य लक्षात घेता ही तपासणी आवश्यक मानली जात होती. त्यांच्या दाव्यानुसार, सरकारी डॉक्टरांनीही ही तपासणी वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक असल्याचे मान्य केले होते.
पीटीआय नेत्याच्या म्हणण्यानुसार, इमरान खान यांना पीआयएमएसमध्ये नेल्यानंतरही डॉक्टरांनी सुचवलेली तपासणी करण्यात आली नाही. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी कथितरीत्या या तपासणीसाठी आवश्यक उपकरण उपलब्ध नसल्याचे सांगितले. मात्र, अक्रम यांनी दावा केला की, रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागात सीटी स्कॅनर उपलब्ध असून अशा प्रकारची तपासणी करण्याची क्षमता तेथे आहे. या घटनेमुळे इमरान खान यांना वेळेवर आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळत आहेत की नाही, याबाबतच्या चिंता आणखी वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पीटीआयचे म्हणणे आहे की, शिफा इंटरनॅशनल रुग्णालयात आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे इमरान खान यांची सीटी कोरोनरी अँजिओग्राफी याच रुग्णालयात स्वतंत्र तज्ज्ञ आणि त्यांच्या खासगी डॉक्टरांच्या देखरेखीखाली करण्यात यावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.तसेच इमरान खान यांच्या कुटुंबीयांना, खासगी वैद्यकीय पथकाला आणि कायदेशीर सल्लागारांना त्यांच्या सर्व वैद्यकीय नोंदी, अहवाल आणि तपासण्यांचे निष्कर्ष उपलब्ध करून द्यावेत, अशीही मागणी पीटीआयने केली आहे.
१८ ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगात असलेल्या माजी पंतप्रधान इमरान खान यांना वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी दोन दिवसांच्या आत इस्लामाबाद येथील शिफा इंटरनॅशनल रुग्णालयात नेण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या उपचारासाठी विशेष वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते.
न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठात न्यायमूर्ती शाहिद वहीद, न्यायमूर्ती नईम अख्तर अफगान आणि न्यायमूर्ती इश्तियाक इब्राहिम यांचा समावेश होता. हे खंडपीठ इमरान खान यांच्या वैद्यकीय उपचारांसह त्यांच्या कुटुंबीय आणि वकिलांना भेटण्यासंबंधीच्या विविध प्रकरणांची सुनावणी करत होते.
पीटीआयच्या म्हणण्यानुसार, २० ऑगस्ट रोजी सरकारने इमरान खान यांना काही काळासाठी पीआयएमएसमध्ये नेले. तेथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना पुन्हा अदियाला तुरुंगात पाठवण्यात आले. सरकारने यामागे सुरक्षेचे कारण दिले होते.विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावर टीका करत, हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान असल्याचा आरोप केला आहे.
आता पीटीआयने इमरान खान यांना शिफा इंटरनॅशनल रुग्णालयाऐवजी पीआयएमएसमध्ये का नेण्यात आले आणि डॉक्टरांनी सुचवलेली सीटी कोरोनरी अँजिओग्राफी का करण्यात आली नाही, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.
पीटीआयने इमरान खान यांची तातडीने सीटी कोरोनरी अँजिओग्राफी करण्याबरोबरच त्यांच्या उपचारांशी संबंधित सर्व वैद्यकीय नोंदी सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. तसेच शिफा इंटरनॅशनल रुग्णालयात त्यांची सर्वसमावेशक वैद्यकीय तपासणी आणि उपचार करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची पूर्ण अंमलबजावणी करण्याची मागणी पक्षाने केली आहे.
याशिवाय, संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशीही पीटीआयची मागणी आहे.इमरान खान यांना पीआयएमएसमध्ये नेण्याचा निर्णय नेमका कोणी घेतला आणि डॉक्टरांनी शिफारस केलेली तपासणी का करण्यात आली नाही, हे चौकशीतून स्पष्ट व्हावे, अशी पक्षाची भूमिका आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode