बंजारा एसटी आरक्षण समितीचा प्रगती अहवाल जाहीर करण्याची मागणी
अकोला, 25 ऑगस्ट (हिं.स.) : बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसंदर्भात शासनाने नियुक्त केलेल्या एसटी आरक्षण अभ्यासक समितीच्या कामकाजाचा प्रगती अहवाल तात्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी अकोला येथे लता राठोड यांच्या नेतृत्वाखाली अनेक बंजारा
Photo


अकोला, 25 ऑगस्ट (हिं.स.) : बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसंदर्भात शासनाने नियुक्त केलेल्या एसटी आरक्षण अभ्यासक समितीच्या कामकाजाचा प्रगती अहवाल तात्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी अकोला येथे लता राठोड यांच्या नेतृत्वाखाली अनेक बंजारा रणरागिणी महिला एकत्र आल्या. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.

समितीच्या स्थापनेला बराच कालावधी उलटूनही समितीने आतापर्यंत केलेल्या कामकाजाची अधिकृत माहिती समाजासमोर जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे बंजारा समाजामध्ये संभ्रम आणि असंतोष निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

समितीने आतापर्यंत केलेल्या जिल्हानिहाय दौऱ्यांची माहिती, संकलित केलेले ऐतिहासिक व शासकीय पुरावे, तज्ज्ञांशी झालेल्या चर्चा तसेच अंतिम अहवाल सादर करण्याची निश्चित तारीख शासनाने जाहीर करावी, अशी मागणी बंजारा रणरागिणींनी केली.

बंजारा समाजाच्या भवितव्याचा प्रश्न असताना अभ्यासक समितीच्या कामकाजात पारदर्शकता असणे आवश्यक आहे. शासनाने तातडीने प्रगती अहवाल जाहीर करून समितीच्या कामाला गती द्यावी अशी भूमिका लताताई राठोड आणि उपस्थित बंजारा रणरागिणींनी मांडली.

दरम्यान, शासनाकडून या मागणीवर तातडीने सकारात्मक कार्यवाही झाली नाही, तर बंजारा रणरागिणी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande