
मुंबई, 26 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबईतील गणेशोत्सवाला वाढते कॉर्पोरेट स्वरूप आणि उद्योगपतींचा वाढता हस्तक्षेप यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या आणि मराठी मातीच्या संस्कृतीशी जोडलेला सण असून, तो उद्योगपतींच्या हातात देणे योग्य नाही, असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुंबईत बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत देशपांडे यांनी विशेषतः ‘लालबागचा राजा’ गणेश मंडळाच्या भूमिकेवर टीका केली.
‘लालबागचा राजा’ मंडळाने गेल्यावर्षी गणेशोत्सव उद्योगपतींच्या हातात दिल्याचा आरोप करत देशपांडे म्हणाले की, गणेशोत्सव भव्य पद्धतीने साजरा करण्यासाठी निधीची गरज असते, मात्र मंडळाला भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळतात. त्यामुळे उद्योगपतींची मदत आणि सल्लागाराची भूमिका स्वीकारण्याची गरज काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अनंत अंबानी यांची सल्लागार म्हणून नियुक्ती कोणत्या कारणासाठी करण्यात आली, असा सवालही त्यांनी केला.
एका मंडळाने अशी भूमिका घेतल्यानंतर आता इतर मोठ्या उद्योगसमूहांचाही गणेशोत्सवात सहभाग वाढत असल्याचे सांगत देशपांडे यांनी भविष्यात अदानी, जेएसडब्ल्यू, गोदरेज यांसारख्या कंपन्यांचा हस्तक्षेप वाढला तर गणेशोत्सव मंडळे कॉर्पोरेट वॉरचे केंद्र बनतील, अशी भीती व्यक्त केली. गणपती हा मार्केटिंगचा विषय नसून तो श्रद्धा आणि संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे देवाचा वापर केवळ ब्रँडिंग किंवा मार्केटिंगसाठी केला जाऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवात उद्या केवळ गरब्याचे स्वरूप दिसावे का, असा सवाल करत मराठी सण गुजराती कंपन्यांच्या हातात देणार आहोत का, असेही देशपांडे यांनी विचारले. ‘लालबागचा राजा’ मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी हे आपले चांगले मित्र असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या भूमिकेला मात्र विरोध केला. या निर्णयाचे आत्मपरीक्षण सर्व गणेशोत्सव मंडळांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले. भविष्यात लालबागचा राजा किंवा चिंतामणी यांसारखी प्रसिद्ध गणेश मंडळे उद्योगपतींच्या नावाने ओळखली जाऊ लागली, तर ते मराठी समाजाला मान्य असेल का, याचा विचार आजच करण्याची गरज असल्याचे देशपांडे यांनी म्हटले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule