सात दिवसांचे CCTV फुटेज उलगडणार ‘डफरीन’ अग्निकांडाचे गूढ; आरोग्य विभागाच्या चौकशीला वेग
अमरावती, 26 ऑगस्ट (हिं.स.) अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक प्रकरणाच्या चौकशीला आता वेग आला आहे. आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या अंतर्गत चौकशीचा आज दुसरा दिवस असून, आरोग्य वि
सात दिवसांचे CCTV फुटेज उघडणार ‘डफरीन’ अग्निकांडाचे गूढ; आरोग्य विभागाच्या चौकशीला वेग


अमरावती, 26 ऑगस्ट (हिं.स.)

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक प्रकरणाच्या चौकशीला आता वेग आला आहे. आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या अंतर्गत चौकशीचा आज दुसरा दिवस असून, आरोग्य विभागाचे आयुक्त तथा चौकशी समितीचे अध्यक्ष आज अमरावतीत दाखल होणार आहेत. त्यामुळे या चौकशीत नेमके कोणते धक्कादायक तथ्य समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, चौकशी समितीने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे रुग्णालयातील मागील सात दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज मागितले आहे. या फुटेजच्या तपासणीतून घटनेच्या आधी आणि घटनेच्या वेळी रुग्णालयातील संबंधित विभागात नेमकी काय परिस्थिती होती, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज हा या चौकशीतील महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.व्हेंटिलेटरचा स्फोट नेमका किती वाजता झाला, त्यावेळी वार्डमध्ये कोण कोण उपस्थित होते, व्हेंटिलेटरजवळ कोणती हालचाल झाली होती आणि आग नेमकी कोणत्या परिस्थितीत लागली, याचा तपास सीसीटीव्हीच्या माध्यमातून केला जाणार आहे. तसेच आग लागल्यानंतर रुग्णालय प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने कोणती पावले उचलली, याचीही माहिती फुटेजमधून मिळण्याची शक्यता आहे.या घटनेनंतर रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्था, व्हेंटिलेटरची देखभाल, मशिनरीची तपासणी आणि संबंधित यंत्रणांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे चौकशी समितीसमोर केवळ स्फोटाचे कारण शोधण्याचेच नव्हे, तर घटनेपूर्वी आणि घटनेनंतरच्या प्रशासनाच्या भूमिकेचीही जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान आहे.आज आरोग्य विभागाचे आयुक्त आणि चौकशी समितीचे अध्यक्ष अमरावतीत आल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे. सात दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज, रुग्णालयातील नोंदी आणि उपलब्ध तांत्रिक माहितीच्या आधारे चौकशीला निर्णायक दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.तीन निष्पाप बालकांचा जीव घेणाऱ्या या घटनेमागचे खरे कारण काय, याचा पर्दाफाश चौकशीअंती होणार आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande