लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन
अकोला, 25 ऑगस्ट (हिं.स.) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने विविध प्रकारच्या खोट्या अफवा आणि दिशाभूल करणारी माहिती पसरविली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी अशा अफव
लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन


अकोला, 25 ऑगस्ट (हिं.स.) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने विविध प्रकारच्या खोट्या अफवा आणि दिशाभूल करणारी माहिती पसरविली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी लक्ष्मण हगवणे यांनी केले आहे.

काही व्यक्तींकडून लाभार्थी महिलांना, “योजनेचे पैसे बंद झाले असल्यास महा-आयडी कार्ड काढल्याने पैसे पुन्हा सुरू होतात”, “महा-आयडी कार्ड काढल्यामुळे केवायसी पूर्ण होते”, “महा-आयडी कार्ड काढले नाही तर योजनेचा लाभ बंद होईल” तसेच “आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल केल्यास लाभ तात्काळ सुरू होतो”, अशा स्वरूपाची दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे.

या प्रकारच्या खोट्या भूलथापा आणि अफवांवर लाभार्थींनी विश्वास ठेवू नये. कोणत्याही अनोळखी व्यक्तीस पैसे देऊ नयेत तसेच वैयक्तिक किंवा बँकिंगशी संबंधित माहिती, ओटीपी, आधार क्रमांक अथवा अन्य गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेबाबत अधिकृत माहिती आणि मार्गदर्शन मिळविण्यासाठी लाभार्थी महिलांनी आपल्या तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ) कार्यालयाशी संपर्क साधावा. केवळ अधिकृत यंत्रणेकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा.

लाभार्थी महिलांची कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. सोशल मीडिया, फोन कॉल किंवा इतर माध्यमांतून मिळणाऱ्या अपुऱ्या अथवा अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी लक्ष्मण हगवणे यांनी स्पष्ट केले आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande