
अकोला, 25 ऑगस्ट (हिं.स.)। देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुरणखेड येथे ‘धागा शौर्य का राखी अभियान २०२६’ उत्साहात पार पडले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वीर भगतसिंग यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सामाजिक कार्यकर्त्या नूतन हरीश पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात पोलीस अधिकारी, पत्रकार, ग्रामपंचायत पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. कुलस्वामिनी चंडिका देवी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राख्या भेट दिल्या, तर कुरणखेड येथील महिला बचत गटांनी सैनिकांसाठी राख्या आणि भावना व्यक्त करणारी पत्रे दिली. मुख्य आयोजक योगेश विजयकर यांनी प्रास्ताविक केले. सपना तळोकार यांनी सूत्रसंचालन, तर पत्रकार संतोष चक्रनारायण यांनी आभार मानले. वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक, शाळा आणि महिला बचत गटांच्या सहकार्याने अभियान यशस्वी झाले. सैनिकांच्या शौर्य, त्याग आणि देशसेवेला कृतज्ञतेची सलामी देत अभियानातून देशभक्तीचा संदेश देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे