‘द व्हॉइस ऑफ अकोला’ नवाब फैजी खान यांचा कोलंबोत सुरेल जलवा
अकोला, 25 ऑगस्ट (हिं.स.) : अकोला शहराचे नाव संगीत क्षेत्रात आता देशाच्या सीमांपलीकडेही पोहोचू लागले आहे. अकोल्याचे प्रसिद्ध गायक नवाब फैजी खान, ज्यांना ‘द व्हॉइस ऑफ अकोला’ म्हणून ओळखले जाते, यांनी श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे आयोजित भव्य सूफी सं
Photo


अकोला, 25 ऑगस्ट (हिं.स.) : अकोला शहराचे नाव संगीत क्षेत्रात आता देशाच्या सीमांपलीकडेही पोहोचू लागले आहे. अकोल्याचे प्रसिद्ध गायक नवाब फैजी खान, ज्यांना ‘द व्हॉइस ऑफ अकोला’ म्हणून ओळखले जाते, यांनी श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे आयोजित भव्य सूफी संगीत कार्यक्रमात आपल्या सुरेल गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

कोलंबो येथील प्रसिद्ध पंचतारांकित सिनामन ग्रँड हॉटेलमध्ये या विशेष सूफी संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने संगीतप्रेमी उपस्थित होते. नवाब फैजी खान यांचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय संगीत दौरा होता. सहकलाकारांसह त्यांनी मंचावर प्रवेश करताच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.

कार्यक्रमादरम्यान नवाब फैजी खान यांनी सूफियाना कलामसह विविध मधुर गीतांचे शानदार सादरीकरण केले. त्यांच्या दमदार आणि हृदयस्पर्शी आवाजाने कोलंबोतील संगीतप्रेमींवर विशेष छाप पाडली. त्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भरभरून दाद दिली. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या आंतरराष्ट्रीय सूफी संगीत कार्यक्रमात त्यांचे उस्ताद रामीझ फैज साहेब, तसेच आमिर खान सूफी, विशाल इंगळे आणि नफीस अहमद यांची विशेष उपस्थिती व सहकार्य लाभले. सर्व कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरणातून कार्यक्रम संस्मरणीय केला.

नवाब फैजी खान यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल अकोल्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील मान्यवरांनी आनंद व्यक्त करून त्यांचे तसेच त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. आपल्या प्रतिभा आणि दमदार गायकीच्या माध्यमातून नवाब फैजी खान यांनी अकोला शहराचे नाव आंतरराष्ट्रीय मंचावर उज्ज्वल केल्याची भावना व्यक्त होत आहे.

कोलंबो येथे नवाब फैजी खान यांनी केलेले सूफी संगीताचे सादरीकरण अकोल्याच्या कला व संगीत क्षेत्रासाठी निश्चितच अभिमानाची बाब ठरली आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande