निखिल ठाकरे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती
अकोला, 25 ऑगस्ट (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या आदेशाने विदर्भातील निखिल ठाकरे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण
Photo


अकोला, 25 ऑगस्ट (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या आदेशाने विदर्भातील निखिल ठाकरे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे विदर्भातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संघटनेला नवी ऊर्जा आणि बळ मिळणार असल्याची भावना युवकांकडून व्यक्त होत आहे.

प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर अमरावती येथील त्यांच्या निवासस्थानी अकोला महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगराध्यक्ष अजय मते यांनी निखिल ठाकरे यांचा भव्य सत्कार केला. यावेळी त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अकोल्यासह संपूर्ण विदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची युवकांची फळी अधिक जोमाने, संघटितपणे आणि ताकदीने कार्य करणार असल्याचे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले. स्वर्गीय अजितदादा पवार यांचे विचार सर्वसामान्य तसेच तळागाळातील युवकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाहीही यावेळी देण्यात आली.

नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसची संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत होईल, विदर्भातील युवकांना नवी दिशा आणि प्रेरणा मिळेल, तसेच पक्षाचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी युवकांची ताकद अधिक प्रभावीपणे उभी राहील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande