नेपाळच्या उत्तर भागात महापूराने हाहाकार, सात ठार, 41 हून अधिक जण बेपत्ता
* नदीकाठच्या नागरिकांना हाय अलर्ट * 25 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश काठमांडू, 26 ऑगस्ट (हिं.स.) - नेपाळच्या उत्तर भागात बुधवारी सकाळी अचानक आलेल्या महापुरामुळे सीमावर्ती भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. या आपत्तीमुळे सखल भागातील अनेक जिल्ह्
नेपाळ महापूर


नेपाळ महापूर


* नदीकाठच्या नागरिकांना हाय अलर्ट

* 25 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

 
 

काठमांडू, 26 ऑगस्ट (हिं.स.) - नेपाळच्या उत्तर भागात बुधवारी सकाळी अचानक आलेल्या महापुरामुळे सीमावर्ती भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. या आपत्तीमुळे सखल भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास 'भोटे कोशी' नदीला अचानक महापूर आला. हा पुराचा पाण्याचा लोट तिबेटच्या बाजूने आल्याचे सांगण्यात येत आहे. हजारो जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात असून भोटेकोशी नदीने १२ गावे उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले जात आहे.

पुराच्या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की, अनेकांना जणू एखादे धरण अचानक फुटल्यासारखे वाटले. स्थानिक नागरिक अजय श्रेष्ठ यांनी पाण्याचा प्रवाह अत्यंत जोरात असल्याचे सांगितले. या पुरात चिलिमे जलविद्युत प्रकल्पासह इतर काही हायड्रोपॉवर प्रकल्पांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. नदीतील पाण्याचा जोर कायम असल्याने नुवाकोट आणि धाडिंग जिल्ह्यांतील काही भागांवरही पुराचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने या भागातील नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जलविज्ञान आणि हवामानशास्त्र विभागानुसार, बुधवारी आलेला हा पूर रसुवा भागात झालेल्या पावसामुळे आलेला नाही, तर तिबेटच्या बाजूने पाण्याचा मोठा साठा आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, याआधी एका वर्षापूर्वी भोटे कोशी नदीला आलेल्या अशाच भीषण पुरामुळे अशी घटना घडली होती आणि रसुवामध्ये कमीत कमी १० जणांचा जीव गेला होता.

नेपाळी सैन्याच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, रसुवा जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे ७ जणांचा मृत्यू झाला असून 41 हून अधिक जण बेपत्ता आहेत. दुपारपर्यंत सुमारे २५ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे रसुवा जिल्ह्यातील तिमुरे आणि लगतच्या स्याफ्रुबेसी परिसरात प्रचंड नुकसान झाले असून अनेक वाहने, सामान व मालमत्ता वाहून गेली आहे.

रसुवा जिल्हा काठमांडूच्या ईशान्येकडे स्थित असून तिबेटच्या सीमेपासून सुमारे १२५ किलोमीटर अंतरावर आहे. नेपाळच्या 'राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने' रसुवा, नुवाकोट, धादिंग, चितवन आणि गोरखा या जिल्ह्यांतील नदीकाठच्या रहिवाशांना पुढील आदेशापर्यंत अत्यंत सतर्क राहण्याचे आणि सुरक्षेचे उपाय योजण्याचे आवाहन केले आहे.

रसुवाचे सहाय्यक मुख्य जिल्हा अधिकारी ध्रुव प्रसाद अधिकारी यांनी सांगितले की, पुराच्या पाण्याची पातळी अचानकपणे वाढली आणि दोन्ही वस्त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. रसुवाचे मुख्य सीमा शुल्क अधिकारी राजेंद्र ढुंगाना यांनी दिलेल्या माहितीनुसार, कस्टम कॉम्प्लेक्स (सीमा शुल्क परिसर) मध्ये उभी असलेली अनेक वाहने आणि सामान पाण्यात वाहून गेले आहे. तसेच नुकताच बांधलेला एक पूलही पुराच्या तीव्र प्रवाहात वाहून गेला.

नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, भीषण पुराची परिस्थिती पाहता बचाव आणि मदत कार्य तीव्र करण्यासाठी रसुवा व आसपासच्या भागात नेपाळ सेना, सशस्त्र पोलीस बल आणि नेपाळ पोलिसांच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि उपाययोजना आखण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे.

नेपाळ सैन्याने त्रिशूली नदीच्या आसपासच्या परिसरात शोध व बचाव मोहीम राबवण्यासाठी दोन हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. आपत्कालीन वैद्यकीय बचाव पथकासह सज्ज असलेले एक Mi-17 हेलिकॉप्टर त्रिशूली येथील जिल्हा रुग्णालयाकडे रवाना करण्यात आल्याचे सैन्याने स्पष्ट केले. मात्र, या भीषण पुरामुळे झालेल्या एकूण नुकसानीची पूर्ण आकडेवारी अजून समोर आलेली नसून माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande