
काठमांडू, 26 ऑगस्ट (हिं.स.) : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान 500 प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळ टुरिझम बोर्डानुसार, बेपत्ता प्रवाशांमध्ये 105 भारतीय नागरिकांचा समावेश आहे.
बेपत्ता प्रवाशांमध्ये परदेशी नागरिकांसह नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, अमेरिका, मलेशिया, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका यांसह अनेक देशांतील नागरिकही या घटनेमुळे प्रभावित झाले आहेत. काही परदेशी प्रवाशांच्या राष्ट्रीयत्वाची अद्याप पुष्टी झालेली नाही. तसेच 37 जणांची अनिवासी भारतीय (एनआरआय) म्हणून नोंद करण्यात आली आहे.
काठमांडू येथील भारतीय दूतावासाने नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे प्रभावित भारतीय नागरिकांना मदत आणि माहिती देण्यासाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, मदतीची किंवा माहितीची गरज असलेल्या व्यक्तींनी
खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
+977 985 131 6807
+977 970 910 7500
अनेक जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट
पुरानंतर नेपाळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट अथॉरिटीने (एनडीआरआरएम) रसुवा, नुवाकोट, धाडिंग, चितवन आणि गोरखा जिल्ह्यांतील नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत नागरिकांनी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, असेही प्रशासनाने सांगितले आहे.
दोन वसाहतींचे मोठे नुकसान
रसुवा जिल्ह्याचे सहाय्यक मुख्य जिल्हा अधिकारी ध्रुव प्रसाद अधिकारी यांनी सांगितले की, पुराची पातळी असामान्यपणे खूपच वाढली होती. या पुरामुळे दोन वसाहतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रसुवा येथील मुख्य सीमाशुल्क अधिकारी राजेंद्र ढुंगाना यांनी सांगितले की, सीमाशुल्क परिसरात ठेवण्यात आलेली अनेक वाहने आणि सामान पुराच्या पाण्यात वाहून गेले. नुकताच बांधण्यात आलेला एक पूलही पुरामुळे नष्ट झाला आहे.
भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन हेल्पलाइन
+977 985 131 6807
+977 970 910 7500
ही परिस्थिती सतत बदलत असून, बेपत्ता व्यक्ती आणि नुकसानीसंदर्भातील आकडे अधिकृत माहितीनुसार बदलू शकतात.
-----------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी