


- बिहारमध्ये हाय अलर्ट जारी- नदीकाठच्या वस्तींच नुकसान, घरं पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली- शेकडो भारतीयांसह परदेशी पर्यटक बेपत्ता
काठमांडू, 26 ऑगस्ट (हिं.स.) - तिबेटमधून नेपाळमध्ये आलेल्या पुराने रौद्ररूप धारण केले आहे. आज सकाळी रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरामुळे हजारोंहून अधिक लोक वाहून गेले, तर घरं पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. अनेक नदीकाठच्या वस्तींचं नुकसान झालं आहे. नेपाळने बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर्स पाठवले. आज बुधवारी आलेल्या या पुरात मृत्यू, जखमी आणि मालमत्तेच्या नुकसानीची अधिकृत आकडेवारी प्रशासनाने जाहीर केलेली नाही. परिस्थितीची गंभीरता बघता जवळपासच्या पाच जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केले आहे.
या पार्श्वभूमीवर भारताच्या बिहार राज्यात महापुराचा मोठा धोका निर्माण झाला असून, संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी वाल्मिकीनगर येथील गंडक बॅरेजचे सर्व ३६ दरवाजे तातडीने उघडण्यात आले आहेत. या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेत बिहार सरकारने संपूर्ण राज्यात ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे.
नेपाळच्या पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार, अद्याप 291 परदेशी पर्यटकांचा कोणताही ठावठिकाणा समोर आलेला नाही. सकाळी भोटेकाशी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे 384 पर्यटक गायब झाले आहेत. सुरुवातीच्या माहितीनुसार, गायब झालेल्यांपैकी 291 हे परदेशी नागरिक आहेत. विविध टुरिझ्म एजन्सीनुसार काही आकडेवारी समोर आली आहे, त्यानुसार, एका ठिकाण 59 आणि दुसर्या ठिकाणी एकूण 46 भारतीयांची संख्या समोर आली आहे. त्यांचा शोध सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, उत्तरी रसुवामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विशेषतः तिमुरे बाजार परिसर, तिमुरे कस्टम ऑफिस आणि स्याब्रुबेसीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जिल्हाधिकारी नुकसान झालेल्या भागाची विस्तृत माहिती संकलित करत आहे. हाइड्रोलॉजीच्या तज्ञांचं म्हणणं आहे की, पाण्याचा अचानक प्रवाह स्थानिक पावसाचं कारण नाही तर तिबेटमध्ये 'ग्लेशियल लेक आउटबर्स्ट' महापूर म्हणजे ग्लेशियर सरोवर फुटल्यानं आलं आहे. या नैसर्गिक आपत्तीत एक हजारांहून अधिक लोक वाहून गेले आहेत. उत्तरगया ग्रामीण नगरपालिकेच्या उपाध्यक्ष चमेली गुरुंग यांच्या म्हणण्यानुसार, स्याफ्रुबेसी, बेत्रावती, मैलुंग, सालेतार, शांती बाजार, परेबेसी, खाल्टी बस्ती, सोले, त्रिशुली आणि बत्तर या वस्त्यांना पुरामुळे मोठा फटका बसला आहे.
हवामानशास्त्र विभाग आणि हाइड्रोलॉजी डिपार्टमेंट हे स्थानिक प्रशासकीय कार्यालयांसोबत मिळून चिनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. या पुराचं मूळ स्थान कोणतं हे माहिती करण्यासाठी उपग्रह डेटाची पडताळणी करत आहे. नेपाळ आपदा व्यवस्थापन अधिकारी बाधित परिसरातील रहिवाशांना तत्काळ सुरक्षा उपाय करण्याचा सल्ला दिला आहे.
काठमांडूमधील रसुवाचे मुख्य जिल्हाधिकारी नरेंद्र परियार यांनी सांगितलं की, पुराचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जिल्हा मुख्यालय आणि आसपासच्या परिसरात पाऊस झालेला नाही. वरच्या भागातील धरण फुटल्यामुळे नदीला अचानक पूर आला असावा, असा संशय असल्याचं आहे. बचावकार्य सुरु आहे, पुरात अडकलेल्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. पण मी आताच काही स्पष्ट सांगू शकत नाही.
नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळं जवळपास 46 जणांचा मृत्यू झाला. तर 105 भारतीयांसह सुमारे 500 जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्त भागांतून आतापर्यंत 46 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली. बागमती प्रांतीय पोलीस कार्यालयाचे प्रवक्ते राजेंद्र प्रसाद धमाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी 18 मृतदेह चितवन जिल्ह्यातून, 16 धाडिंगमधून, 11 नुवाकोटमधून आणि एक रसुवा जिल्ह्यातून सापडले आहेत.
नेपाळ पर्यटन मंडळानं जारी केलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुरामुळं बेपत्ता झालेल्या 384 पर्यटकांमध्ये 100 हून अधिक भारतीयांचा समावेश आहे. पर्यटन मंडळानं दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता असलेल्या 384 पर्यटकांमध्ये 291 परदेशी नागरिक आणि 93 नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. या परदेशी नागरिकांमध्ये भारतासह युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, मलेशिया, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांसारख्या विविध देशांतील पर्यटकांचा समावेश आहे. ज्यामध्ये केवळ भारतातील 105 पर्यटकांचा समावेश आहे. याचबरोबर, नेपाळ पर्यटन मंडळानं मदतीसाठी टोल-फ्री आपत्कालीन क्रमांक 1234, हॉटलाइन 1144 किंवा पर्यटक पोलीस क्रमांक 9851289445 देखील जारी केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी