अमरावती : आगीच्या घटनेनंतर ३६ नवजात बालकांना सुरक्षितपणे हलविले
अमरावती, 27 ऑगस्ट (हिं.स.)। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार तातडीच्या उपाययोजना; समितीला सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व मोठ्या आस्थापनांच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण अमरावती येथील जिल्हा स्
आगीच्या घटनेनंतर ३६ नवजात बालकांना सुरक्षितपणे हलविले


अमरावती, 27 ऑगस्ट (हिं.स.)।

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार तातडीच्या उपाययोजना; समितीला सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश

जिल्ह्यातील सर्व मोठ्या आस्थापनांच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण

अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय नवजात शिशू अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे प्रथमदर्शनी व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहाटे ४ वाजल्यापासून संबंधित सर्व यंत्रणांशी संपर्क साधून आवश्यक निर्देश दिले.

या दुर्दैवी घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार सुरक्षिततेच्या दृष्टीने एकूण ३६ नवजात बालकांना उपचारासाठी इतर रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. त्यापैकी २९ नवजात बालकांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर विनामूल्य उपचार सुरू आहेत. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १९, मुरके रुग्णालयात ८ आणि पारिजात रुग्णालयात २ बालकांना दाखल करण्यात आले आहे. तसेच होप रुग्णालयात ८ बालकांना दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, सात नवजात बालके त्यांच्या मातांसोबत जिल्हा स्त्री रुग्णालय, अमरावती येथे वैद्यकीय देखरेखीखाली सुरक्षित आहेत. स्थलांतरित करण्यात आलेल्या बालकांच्या उपचाराचा खर्च पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार विनामूल्य करण्यात आला आहे.

या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेतली असून, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य सचिव यांना घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीला सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार अमरावती जिल्ह्यातील सर्व मोठ्या आस्थापनांच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण तसेच आग प्रतिबंधक सराव एका महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रभावी उपाययोजना करता याव्यात, यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande