सर्व युक्ती शिकविणारा ग्रंथ म्हणजे महाभारत- स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज
परभणी, 27 ऑगस्ट (हिं.स.)। जीवनाच्या यशस्वीतेसाठी लागणारे सर्व युक्ती शिकवणारा ग्रंथ म्हणजे महाभारत होय, असे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरी जी महाराज यांनी परभणीत आज गुरुवार रोजी शांती पर्व संदेश या व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पप्रसंगी बोलताना केल
जीवनाच्या यशस्वीतेसाठी लागणार्या सर्व युक्ती शिकविणारा ग्रंथ म्हणजे महाभारत- स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांचे प्रतिपादन


परभणी, 27 ऑगस्ट (हिं.स.)। जीवनाच्या यशस्वीतेसाठी लागणारे सर्व युक्ती शिकवणारा ग्रंथ म्हणजे महाभारत होय, असे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरी जी महाराज यांनी परभणीत आज गुरुवार रोजी शांती पर्व संदेश या व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पप्रसंगी बोलताना केले.

येथील उद्योजक गोविंदप्रसाद अजमेरा परिवाराच्या वतीने अक्षदा मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या तीन दिवशीय ‘महाभारतातील शांतीपर्व’ या विषयावरील प्रवचनमालेत ते बोलत होते. यावेळी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट अयोध्याचे कोषाध्यक्ष प.पु. स्वामी गोविंददेव गिरी यांचे पूजन आणि दीप प्रज्वलन आमदार डॉ. राहुल पाटील, माजी आमदार सुरेशदादा देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर, अॅड. अशोक सोनी, उद्योजक तथा आयोजक गोविंद अजमेरा, गोपाल अजमेरा यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वामी गोविंददेव गिरी यांनी पुढे सांगितले की, जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता अत्यंत महत्त्वाची आहे. जगात ज्यांनी यश संपादन केले, त्यांनी योग्य वेळ ओळखून विचारपूर्वक निर्णय घेतले, निर्णय घेण्यात झालेली चूक किंवा वेळ चुकल्यास अपयशाला सामोरे जावे लागते. यशस्वी व्यक्ती होण्यासाठी केवळ मेहनत पुरेशी नाही तर विवेक, निर्णयक्षमता आणि प्रसंग ओळखण्याची बुद्धी आवश्यक आहे. त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची कला विकसित करण्यासाठी प्रत्येकाने महाभारताचा नियमित अभ्यास केला पाहिजे. तोच अभ्यास उपयुक्त ठरणारा आहे. महाभारताच्या चिंतनामुळे बुद्धीला धार येते आणि जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होते, असे ते म्हणाले.

चारही वेदांचे सार महाभारतात आहे. महाभारताचे सार भगवद्गीतेमध्ये सामावलेले आहे. भगवद्गीता महाभारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे महाभारताचा अभ्यास न करता भगवद्गीतेचा संपूर्ण अर्थ समजून घेणे कठीण आहे. महाभारतातील भगवान श्रीकृष्णांचे आचरण हे भगवद्गीतेवरील सर्वोत्तम भाष्य असल्याचेही ते म्हणाले. भगवद्गीतेतील अंतिम श्लोक विजयाचा संदेश देतो. श्रीकृष्णासारखा विवेक आणि अर्जुनासारखी कर्तव्यनिष्ठा ज्या ठिकाणी असते, त्या ठिकाणी विजय निश्चित असतो, असाही संदेश त्यांनी दिला.

संपूर्ण महाभारताचा अभ्यास करणे शक्य नसल्यास किमान शांतिपर्व आणि अनुशासनपर्वाचा प्रत्येकाने अभ्यास करावा. शांतिपर्व हा भारतीय संस्कृतीचा ज्ञानकोश आहे. त्यामध्ये समाजजीवन, राजधर्म, नीती, कर्तव्य आणि मानवी जीवनाविषयीचे मौलिक ज्ञान असल्याचे ते म्हणाले. महाभारताचा अभ्यास विद्यार्थ्यांसह प्रत्येक व्यक्तीला जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शक ठरतो, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी यावेळी भागवताचार्य बाळू असोलेकर, उद्योजक जयप्रकाश बिहाणी, डॉ. केदार खटींग, डॉ. राजगोपाल कालानी, डॉ. विनोद मंत्री, उद्योजक ओमप्रकाश डागा, हभप माधव बुवा आजेगावकर, अतुल गुरु जोशी, घनश्याम मालपाणी, बालाजी जोशी यांच्यासह तीन दिवस चालणार्या या व्याख्यानमालेस भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

----------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande