
बीड, 27 ऑगस्ट (हिं.स.)। बीड शहरातील अत्यंत गजबजलेल्या भाबीड जी मंडई परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील अतिक्रमणांच्या समस्येची गंभीर दखल घेत पोलिसांनी थेट रस्त्यावर उतरून धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रशिक्षणार्थी डीवायएसपी भारत मांडरे आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी सहकाऱ्यांसह भाजी मंडई भागात प्रत्यक्ष पाहणी करत रस्त्यावर आखलेल्या ‘पांढऱ्या पट्ट्याच्या’ आतच व्यवसाय करण्याचे आदेश विक्रेत्यांना दिले आहेत. उद्यापासून या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.
वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय
भाजी मंडई परिसर हा शहरातील प्रमुख व्यापारी व वर्दळीचा भाग आहे. या भागात शाळा असल्याने विद्यार्थ्यांची मोठी ये-जा असते. मात्र, रस्त्याच्या कडेला असणारे फळ व भाजी विक्रेते आपले गाडे आणि स्टॉल पांढऱ्या पट्ट्याच्या पुढे आणून लावत असल्याने, तसेच दुचाकी-चारचाकी वाहनांच्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. यासंदर्भात नागरिकांकडून वाढत्या तक्रारी प्राप्त होत होत्या.
पोलिसांची थेट व्यापाऱ्यांशी चर्चा व सूचना
या समस्येचे निवारण करण्यासाठी डीवायएसपी भारत मांडरे व पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी पथकासह भाजी मंडईचा आढावा घेतला. त्यांनी व्यापाऱ्यांना समज देत पांढऱ्या पट्ट्याच्या आतच व्यवसाय मांडण्याचे निर्देश दिले.
भाजी मंडईतील पांढऱ्या पट्ट्याच्या आतच विक्रेत्यांनी आपापले गाडे व स्टॉल लावावेत. यामुळे रस्त्याची पुरेशी रुंदी उपलब्ध होऊन वाहतूक सुरळीत होईल आणि विद्यार्थी, पादचारी व वाहनधारकांची गैरसोय टळेल. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर उद्यापासून दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
— वाहतूक पोलीस शाखा, बीड
दोन महिन्यांपासून मोहिमेचे सत्र
पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन महिन्यांपासून बीड शहरातील सुभाष रोड, भाजी मंडई, नगर रोड, राजीव गांधी चौक आणि बसस्थानक परिसरात अतिक्रमणांविरोधात सातत्याने मोहिमा राबवल्या जात आहेत. यामुळे शहरातील अतिक्रमणांना काही प्रमाणात आळा बसला होता; मात्र भाजी मंडईत पुन्हा विक्रेते पुढे येत असल्याने पोलिसांनी आता अधिक कठोर भूमिका घेतली आहे.
कारवाईत सहभागी पथक
ही धडक मोहीम DYSP भारत मांडरे, PI वैभव पाटील, PSI कुठलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार त्रिंबक कुडके, फुलचंद जाधव, आजिनाथ मुंडे, शेषनारायण गाडे, पो.अं. वशिम शेख, संतोष गाडे, राजाभाऊ तांदळे आणि बीड शहर महिला पोलीस अंमलदार उषा गाडे यांच्या पथकाने पार पाडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis