
रायगड, 27 ऑगस्ट (हिं.स.)। जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने दर्शन व पर्यटनासाठी नेपाळला गेलेले रायगड जिल्ह्यातील ३७ नागरिक सध्या सागा (चीन) येथे सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या सोबत दोन डॉक्टरही असल्याने वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक काळजी घेतली जात आहे.
या नागरिकांकडे २९ ऑगस्ट २०२६ रोजी काठमांडूहून भारतात परतण्यासाठीची विमान तिकिटे आहेत. मात्र, सध्याच्या परिस्थितीत सागा येथून काठमांडूकडे जाण्यास स्थानिक प्रशासनाकडून परवानगी मिळालेली नसल्याने त्यांच्या परतीच्या प्रवासास अडथळा निर्माण झाला आहे. दरम्यान, रायगडचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष नेपाळमध्ये असलेल्या या नागरिकांच्या सतत संपर्कात आहेत. त्यांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली जात असून आवश्यक ती मदत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.
प्रशासनाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून काठमांडूकडे जाण्यासाठी आवश्यक परवानगी मिळविण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यानंतर नियोजित विमानाने भारतात परतण्याचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे.
सर्व ३७ नागरिक सुरक्षित असून कोणाच्याही प्रकृतीबाबत गंभीर बाब नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थितीवर जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे बारकाईने लक्ष असून, नागरिकांना आवश्यक मदत मिळावी यासाठी संबंधित यंत्रणांशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)