हिट अँड रन अपघातग्रस्तांनी शासनाच्या नुकसान भरपाई योजनेचा लाभ घ्यावा : प्रादेशिक परिवहन अधिकारी
कोल्हापूर, 27 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्ह्यात ‘हिट अँड रन मोटार अपघात पीडित नुकसान भरपाई योजने’अंतर्गत अपघातांच्या तुलनेत अत्यंत कमी दावे दाखल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यात हिट अँड रन अपघाताच्या घटना घडत असतानाही अनेक पात्र लाभार्थी केवळ माहि
हिट अँड रन अपघातग्रस्तांनी शासनाच्या नुकसान भरपाई योजनेचा लाभ घ्यावा : प्रादेशिक परिवहन अधिकारी


कोल्हापूर, 27 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्ह्यात ‘हिट अँड रन मोटार अपघात पीडित नुकसान भरपाई योजने’अंतर्गत अपघातांच्या तुलनेत अत्यंत कमी दावे दाखल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यात हिट अँड रन अपघाताच्या घटना घडत असतानाही अनेक पात्र लाभार्थी केवळ माहितीच्या अभावामुळे किंवा दावा दाखल करण्याच्या प्रक्रियेची माहिती नसल्यामुळे शासनाच्या आर्थिक सहाय्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे नागरिक, पोलीस यंत्रणा, आरोग्य संस्था, सामाजिक संस्था तसेच प्रसारमाध्यमांनी या योजनेबाबत जनजागृती करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या रस्ता परिवहन व महामार्ग मंत्रालयामार्फत हिट अँड रन मोटार अपघात पीडित नुकसानभरपाई योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. हिट अँड रन अपघातामध्ये मृत्यू अथवा गंभीर दुखापत झालेल्या व्यक्ती अथवा त्यांच्या कुटुंबियांना तातडीची आर्थिक मदत उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश असून योजनेनुसार हिट अँड रन अपघातात मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांना दोन लाख रुपये तर गंभीर दुखापत झाल्यास जखमी व्यक्तीस 50 हजार रुपये इतकी आर्थिक मदत मोटार वाहन अपघात निधीतून देण्यात येते.

हिट अँड रन अपघात म्हणजे काय?

ज्या मोटार वाहन अपघातामध्ये अपघात करणाऱ्या वाहनाची अथवा चालकाची ओळख पटत नाही किंवा अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पळून जातो व त्याचा शोध लागत नाही, अशा अपघातास ‘हिट अँड रन’ अपघात असे म्हणतात.

गंभीर दुखापत झालेली व्यक्ती, अपघातात मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीचे कायदेशीर वारस, लाभार्थी अल्पवयीन असल्यास त्याचा पालक किंवा कायदेशीर संरक्षक, आवश्यक असल्यास अधिकृत प्रतिनिधी यामध्ये दावा करु शकतात.

दावा कुठे करावा?

अपघात ज्या तालुक्याच्या हद्दीत घडला असेल, त्या तालुक्याचे तहसीलदार हे Claims Enquiry Officer म्हणून कार्य करतात. संबंधित तहसीलदारांकडे विहित नमुन्यात दावा अर्ज सादर करावा. दावा दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे- विहित नमुन्यातील अर्ज, प्रथम माहिती अहवाल (FIR) अथवा पोलीस कागदपत्रे, जखमी व्यक्तीचे वैद्यकीय प्रमाणपत्र/रुग्णालयीन कागदपत्रे, मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र व शवविच्छेदन अहवाल (लागू असल्यास), कायदेशीर वारस असल्याचा पुरावा, आधार कार्ड, बँक खाते तपशील व इतर आवश्यक कागदपत्रे इ.

दावा दाखल करण्याची प्रक्रिया- अपघाताची तात्काळ माहिती जवळच्या पोलीस ठाण्यास द्यावी. पोलीस यंत्रणेकडून हिट अँड रन प्रकरणाची नोंद करण्यात येते. लाभार्थी किंवा त्यांच्या वारसांनी अपघात ज्या तालुक्यात घडला त्या तालुक्याच्या तहसीलदार (Claims Enquiry Officer) यांच्याकडे दावा अर्ज सादर करावा. तहसीलदारांकडून कागदपत्रांची व घटनेची पडताळणी करून अहवाल तयार करण्यात येतो. पात्रता निश्चित झाल्यानंतर शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाईची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.

जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालये, पोलीस अधिकारी, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, महानगरपालिका तसेच सामाजिक संस्थांनी हिट अँड रन अपघातातील जखमी व्यक्ती अथवा मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना या योजनेची माहिती देऊन दावा दाखल करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करावे.

हिट अँड रन अपघातातील एकही पात्र लाभार्थी शासनाच्या आर्थिक सहाय्यापासून वंचित राहू नये, यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन अपघात ज्या तालुक्यात घडला त्या तालुक्याच्या तहसीलदार (Claims Enquiry Officer) यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह दावा दाखल करावा. अधिक माहितीसाठी संबंधित तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर अथवा संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande