मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईपर्यंत मोजणी, भूसंपादन व जमीन खरेदीची कामे स्थगित
All work, including counting, suspended until the Chief Minister's meeting
All work, including counting


रिंगरोडबाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे प्रशासन नमले

नाशिक, २७ ऑगस्ट (हिं.स.) : रिंगरोडसह महामार्ग क्रमांक २९ आणि पाथर्डी कचरा डेपोबाधित शेतकऱ्यांच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनापुढे अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले. करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर बैठक होईपर्यंत रिंगरोडसंदर्भातील मोजणी, भूसंपादन, जमीन खरेदी, नोटिसा तसेच अन्य प्रशासकीय कामे स्थगित ठेवण्याचे आदेश पालकमंत्री महाजन यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिले. या निर्णयामुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आंदोलनस्थळी सुमारे ५०० ते ६०० शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या मोबदल्यातील तफावत, ग्रामीण भागासाठी गुणांक दोन, फळझाडांचे दर, एकाच गावातील वेगवेगळे मोबदला दर तसेच रिंगरोडच्या अलाइनमेंटवरील आक्षेप यांसह प्रकल्पामुळे होणाऱ्या सामाजिक व आर्थिक नुकसानीबाबत पालकमंत्र्यांसमोर भूमिका मांडली. महामार्ग क्रमांक २९ साठी विना मोबदला भूसंपादन होऊ देणार नसल्याचेही शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधता न आल्याने महिला शेतकऱ्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांनाच रक्षाबंधनानिमित्त राख्या बांधल्या. तसेच चार ते पाच महिला शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वेळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महाजन यांनी दिले.

आंदोलनाला सहकार्य करणारे पोलीस प्रशासन, पत्रकार बांधव, किसान सभा, मनसे आणि विविध संघटनांचे किसान सभेचे सरचिटणीस राजू दिसले यांनी आभार मानले. यावेळी शेतकरी नेते नाना बच्छाव, छावा क्रांतिवीर सेनेचे शिवा तेलंग, नवनाथ शिंदे, आशिष हिरे, प्रवीण पाटील, वैभव दळवी, शुभम देशमुख आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर योग्य निर्णय घ्यावा

“मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर बैठक, प्रश्नांवर ठोस तोडगा आणि शेतकऱ्यांना न्याय हाच आता पुढील मार्ग आहे. नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि संबंधित अधिकारी शेतकऱ्यांची दिशाभूल करत हिटलरशाहीप्रमाणे काम करत आहेत. हे काम त्यांनी करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुढील बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर योग्य निर्णय घेऊन न्याय द्यावा. अधिकाऱ्यांच्या नादी न लागता शेतकरी हिताचा निर्णय घेणे विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असेल,” असे करण गायकर, संस्थापक अध्यक्ष, छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र यांनी सांगितले.

लवकरच मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून पुढील दोन ते तीन दिवसांत मंत्रालयात सुमारे एक तासाची सविस्तर बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला रिंगरोडबाधित शेतकरी प्रतिनिधी, एमएसआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत रिंगरोडची अलाइनमेंट, भूसंपादनाचा मोबदला, गुणांक, फळझाडांचे दर आदी प्रश्नांवर अंतिम तोडगा काढण्याचे आश्वासन महाजन यांनी दिले.

------------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande