
जळगाव, 27 ऑगस्ट (हिं.स.) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्ज महाडीबीटी २.० प्रणालीवर सुरू करण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांनी https;//mahadbt2.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर आधार आधारित लॉगिन करून नवीन महाआयडी (Maha ID) तयार करावा. मागील पोर्टलवरील युजर आयडी व पासवर्ड यापुढे आवश्यक राहणार नाही. अर्ज भरताना आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक,ईमेल, बँक खाते, जातीचा दाखला,अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व शैक्षणिक गुणपत्रके माहिती अचूक भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. नूतनीकरण अर्जदारांनीही नवीन महाआयडीद्वारे लॉगिन करून ‘माझा अर्ज नूतनीकरण करावा’ हा पर्याय निवडावा. शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे. महाविद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास सहकार्य करून अर्ज प्रलंबित ठेवू नयेत. अनुसूचित जातीच्या पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण व परीक्षा शुल्क घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ०२२-४९१५०८०० / १८००१०२५३११ किंवा helpdesk@mahadbt.gov.in वर संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर