
लातूर, 27 ऑगस्ट (हिं.स.)। शिरूर पंचायत समिती अनंतपाळच्या सभागृहात एकात्मिक बालविकास केंद्राच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रिया २०२६' अंतर्गत निवड झालेल्या नवनियुक्त अंगणवाडी सेविका व मदतनीस अशा कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.
बालविकास आणि कुपोषणमुक्तीच्या कार्यात अंगणवाडी सेविका व मदतनीसांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडून तालुक्यातील बालकांचे आरोग्य, पोषण आणि बौद्धिक विकासाकडे विशेष लक्ष द्यावे,
असे आवाहन पं.स. सभापती संजय सूर्यवंशी यांनी केले. त्यांच्या योगदानातून शिरूर अनंतपाळ तालुका जिल्हाभरात आदर्श ठरेल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या उपसभापती पूनम चव्हाण या होत्या. यावेळी पंचायत समिती सभापती संजय सूर्यवंशी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि) जावेद शेख, पंचायत समिती सदस्या मीना लांडगे आणि जिल्हा कक्षाचे विस्तार अधिकारी बोंबले यांची
प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी नवनियुक्त अंगणवाडी सेविका व मदतनीसांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील बालकांपर्यंत तसेच गरोदर व स्तनदा मातांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची आणि आपल्या कर्तव्याशी बांधील राहण्याची शपथ यावेळी नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी घेतली. या सोहळ्यास बालविकास प्रकल्प अधिकारी साईनाथ वंगारी, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर निकम,
कनिष्ठ सहाय्यक राहूल शिरूरे, अंगणवाडी पर्यवेक्षिका एस. डी. शिवनगे, संगीता गिरी, पी. एल. डोंबे, परिचर बालाजी कांबळे यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडीसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालविकास प्रकल्प अधिकारी साईनाथ वंगारी यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis