
अमरावती, 27 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीला अधिक मजबूत, गतिमान आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने भाजपा महाराष्ट्र प्रदेशाकडून अमरावती शहर जिल्हा कोअर कमिटीची घोषणा करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार प्रदेश महामंत्री संजय कुटे यांच्या स्वाक्षरीने २५ ऑगस्ट २०२६ रोजी या कोअर कमिटीचे गठन करण्यात आले. भाजपा अमरावती शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही कोअर कमिटी कार्यरत राहणार आहे.
भारतीय जनता पार्टीमध्ये संघटनात्मक रचनेला विशेष महत्त्व असून, बूथपासून जिल्हास्तरापर्यंत पक्षाची यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी कोअर कमिटी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आगामी काळात पक्षाच्या वतीने राबविण्यात येणारे विविध संघटनात्मक कार्यक्रम, अभियान, जनसंपर्क उपक्रम तसेच सामाजिक कार्यक्रमांचे प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणी या समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. अमरावती शहरातील प्रत्येक भागात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, नवीन कार्यकर्त्यांना पक्षाच्या विचारधारेशी जोडणे आणि विद्यमान कार्यकर्त्यांमध्ये समन्वय निर्माण करणे, यावर विशेष भर दिला जाणार आहे.
प्रत्येक बूथ, शक्तिकेंद्र आणि मंडळ पातळीवर संघटना अधिक मजबूत करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासाशी संबंधित प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचाही कोअर कमिटीचा प्रयत्न राहणार आहे. केंद्र व महाराष्ट्र राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचविणे आणि लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक सहकार्य करणे, यालाही प्राधान्य दिले जाणार आहे.
सरकारच्या योजना केवळ कागदावर न राहता त्यांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती आणि जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. याप्रसंगी अमरावती शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी कोअर कमिटीच्या सर्व नियुक्त पदाधिकाऱ्यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश महामंत्री संजय कुटे तसेच पक्ष नेतृत्वाचे आभार व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी