
पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांना संदेश
‘जो खेलेगा, वो खिलेगा’
चंद्रपूर, २७ ऑगस्ट (हिं.स.) : जे खेळतात, त्यांचीच भरभराट होते. खेळाडूंमुळे त्यांच्या राज्यांची आणि शहरांची देशात वेगळी ओळख निर्माण होते. त्यामुळे ‘जो खेलेगा, वो खिलेगा’ हा बहुमूल्य संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६ निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ ऑगस्ट रोजी ‘विकसित भारत-युवा कनेक्ट’ या देशव्यापी कार्यक्रमांतर्गत तरुण, युवा खेळाडू आणि विद्यार्थ्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. या कार्यक्रमाचा थेट आभासी संवाद चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाने पंतप्रधानांशी थेट संवादासाठी या महाविद्यालयाची निवड केली होती.
महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, मेरा युवा भारत चंद्रपूरचे श्री. मंगेश दुबे, आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेटपटू स्वप्निल जितेंद्र गोंड, आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू सखी दोरखंडे आणि राष्ट्रीय बॉक्सर कबीर साळवे प्रमुख उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशाला २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी सक्षम खेळाडू घडविण्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी देशभरात ‘टॅलेंट हब’ अर्थात गुणवत्ता शोध केंद्रांचा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी मेहनत, चिकाटी आणि नियमित सराव हेच उत्तम व यशस्वी खेळाडूच्या कामगिरीचे मूलभूत आधार असल्याचे सांगितले. केवळ उपजत प्रतिभेपेक्षा दररोज घाम गाळून केलेली मेहनत खेळाडूला यशाच्या उच्च शिखरावर पोहोचवते, असे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. वंदना खणके, डॉ. निखिल देशमुख, शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. पुष्पांजली कांबळे यांच्यासह प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, रासेयो स्वयंसेवक, खेळाडू आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन स्वयंसेवक रोशन चौधरी यांनी केले, तर गौरव झाडे यांनी आभार मानले. यावेळी उपस्थित आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. काटकर यांनी उपस्थितांना ‘विकसित भारत – नशामुक्त युवा’ ही शपथ दिली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
दरम्यान, सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर व सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार तसेच कार्यकारी सदस्य राकेश पटेल, शेख रमजान, सुरेश पोटदुखे आणि जीनेश पटेल यांनी या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.----------------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव