
धाराशिव, 27 ऑगस्ट (हिं.स.)।
नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून,तेथे विविध देशांतील व राज्यातील अनेक नागरिक व पर्यटक अडकले असल्याची माहिती आहे.या पार्श्वभूमीवर अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांना आवश्यक ती मदत व समन्वय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,मंत्रालय, मुंबई यांच्यामार्फत माहिती नोंदविण्यासाठी विशेष लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
माहिती नोंदविण्यासाठी लिंक : https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/
या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा पर्यटक सध्या नेपाळमध्ये अडकले असतील किंवा त्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नसेल, तर त्यांच्या कुटुंबीयांनी अथवा नातेवाईकांनी वरील लिंकवर जाऊन संबंधित नागरिकाची सविस्तर माहिती भरावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
तसेच,संबंधित नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र,तथा वार रूम जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथेही तात्काळ संपर्क साधावा.
जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, धाराशिव
☎️ 02472 _225618/224366
☎️ 1077 (टोल फ्री)
माहिती नोंदविताना संबंधित व्यक्तीचे नाव,मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल,प्रवासाचा तपशील तसेच कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक, उपलब्ध असल्यास,अचूकपणे नमूद करावा.
धाराशिव जिल्ह्यातील पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्यास घाबरून न जाता उपलब्ध अधिकृत माध्यमांद्वारे माहिती नोंदवावी व जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.नेपाळमधील आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती माहिती संकलित करून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहेत.
कीर्ती किरण पूजार,
जिल्हाधिकारी,धाराशिव
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis