
अमरावती, 27 ऑगस्ट (हिं.स.)।
कृषी उत्पन्न बाजार समिती, दर्यापूर येथे भगवा दुपट्टा घालण्यासंदर्भात एका संचालकाकडून झालेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद अखेर मिटला आहे. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर संबंधित संचालकांनी आपले वक्तव्य चुकून झाल्याचे सांगत हात जोडून जाहीर माफी मागितली. त्यानंतर शिवसेनेने नियोजित आंदोलन मागे घेतले.काही दिवसांपूर्वी बाजार समिती परिसरात शेतकरी, हमाल व मापारी यांनी भगवा दुपट्टा घालू नये, असे वक्तव्य संबंधित संचालकाच्या तोंडून निघाल्याने शेतकरी बांधव आणि शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. या प्रकरणाचा निषेध करत शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी संबंधित संचालकांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.त्यानुसार बुधवारी शिवसेनेच्या वतीने रविभाऊ गणोरकर यांच्या घरापासून कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत बाजार समिती कार्यालयात ठिय्या दिला. वाढता रोष लक्षात घेऊन अखेर संबंधित संचालकांनी आपले वक्तव्य अनवधानाने झाल्याचे स्पष्ट केले.यापुढे बाजार समितीत कोणालाही भगवा दुपट्टा घालण्यास मनाई केली जाणार नाही तसेच सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल, असे आश्वासनही संचालकांनी दिले. जाहीर माफीनंतर शिवसेनेने आंदोलन मागे घेतले.
यावेळी गोपाल पाटील अरबट, रविभाऊ गणोरकर, प्रदीप मलिए, गणेशराव लाजुरकर, मनोज पाटील गव्हाणे, महेंद्र भांडे, तुषार चौधरी, अतुल सगणे यांच्यासह शिवसेना, युवासेना व शेतकरी सेनेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
--------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी