
ठाणे, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। ठाण्यातील शिधावाटप कार्यालयावर झाडाच्या फांद्या पडल्याने कौले आणि पत्र्याचे मोठे नुकसान झाले. आमदार संजय केळकर यांनी पाहणी करत वृक्ष प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी शिधावाटप अधिकारी सौ. चव्हाण, श्री. काकडे, श्री. डुमरे, PWD च्या कल्याणी पाटील व ठामपा वृक्षप्राधिकरणचे ओमकार सावंत उपस्थित होते.
शिधावाटप कार्यालय आवारात असलेल्या झाडाच्या मोठ्या फांद्या पडल्याने कार्यालयावरील पत्रे, कौले आणि भिंतीचे नुकसान झाले. हे कार्यालय नेहमी गजबजलेले असते. मात्र सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. घटनेची माहिती मिळताच आमदार संजय केळकर यांनी कार्यालयाची पाहणी केली. ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सुट्टीच्या दिवशी फांद्यांची छाटणी करण्याच्या सूचना दिल्या. भिंतीचे नुकसान झाल्याने राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना देखील यावेळी बोलावून आवश्यक दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी माध्यमांशी बोलताना श्री. केळकर यांनी सांगितले की पाच वर्षांपूर्वी या कार्यालयाची अवस्था वाईट होती. पाण्याच्या गळतीने भिंती, छप्पर आणि फरश्या ओल्या असत. त्यामुळे साहित्याचे नुकसान होत असे, शिवाय कर्मचारी वर्गाला देखील आरोग्यासह अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. या कार्यालयासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून आदर्श कार्यालय तयार करण्यात आले. राज्य शासनाकडून देखील याची दखल घेण्यात आली. हे कार्यालय नेहमीच नागरिकांनी गजबजलेले असल्याने त्याची तत्काळ दुरुस्ती आणि आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर