यवतमाळमध्ये वीजबिल वसुली पथकावर हल्ला
यवतमाळ, 27 ऑगस्ट (हिं.स.) : थकीत वीजबिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला केल्याची घटना शहरानजीकच्या भारी शिवारात सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी मुकेश बालाजी गुल्हाणे (वय 42, रा. पाटील हॉस्पिटलजवळ, यवतमाळ) यां
यवतमाळमध्ये वीजबिल वसुली पथकावर हल्ला


यवतमाळ, 27 ऑगस्ट (हिं.स.) : थकीत वीजबिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला केल्याची घटना शहरानजीकच्या भारी शिवारात सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी मुकेश बालाजी गुल्हाणे (वय 42, रा. पाटील हॉस्पिटलजवळ, यवतमाळ) यांनी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, भारी शिवारातील सुभाष भाऊराव सरोदे (वय 60) यांच्याकडे वीजबिलाची थकबाकी होती. मंगळवारी सकाळी महावितरणचे पथक थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी त्यांच्या घरी गेले. पथकाने थकीत वीजबिल भरण्याची मागणी केली असता सरोदे यांनी टाळाटाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

थकबाकी न भरल्याने महावितरणच्या पथकाने वीजमीटर काढण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मीटर काढण्याच्या कारणावरून सरोदे यांनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचा आरोप आहे. तसेच कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून पाठीवर मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकारानंतर महावितरणचे पथक थेट यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात पोहोचले. मुकेश गुल्हाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सुभाष सरोदे यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार नीलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ शहर पोलिस करीत आहेत.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande