सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, 27 ऑगस्ट (हिं.स.)। खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ५ लाख ५४ हजार १६० हेक्टर असून,यंदा ५ लाख ३२ हजार ९७० हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी जिल्ह्याचे प्रमुख खरीप पीक असलेल्या सोयाबीनची ४ लाख ६४ हजार ७५४ हेक्टर क्षेत्र
सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन


छत्रपती संभाजीनगर, 27 ऑगस्ट (हिं.स.)।

खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ५ लाख ५४ हजार १६० हेक्टर असून,यंदा ५ लाख ३२ हजार ९७० हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी जिल्ह्याचे प्रमुख खरीप पीक असलेल्या सोयाबीनची ४ लाख ६४ हजार ७५४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

सोयाबीन पिकाच्या सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी मौजे रुईभर, ता.धाराशिव येथे कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ,कृषी उपसंचालक, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच शेतकऱ्यांनी क्षेत्रभेट दिली.यावेळी सोयाबीन पिकाच्या विविध अवस्था,ओलाव्याच्या ताणाचा परिणाम,रोग-किडींचा प्रादुर्भाव आणि पुढील काळातील पीक व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

पावसामुळे पिकाला दिलासा

पावसाचा खंड पडल्याने काही भागांमध्ये सोयाबीनच्या वाढीवर परिणाम झाला असून,काही ठिकाणी झाडांमध्ये माना टाकणे, पानांची लवकर वृद्धत्वाकडे वाटचाल होणे तसेच अन्नद्रव्यांचे शोषण कमी होणे अशी लक्षणे दिसून येत आहेत.मात्र,अलीकडील पावसामुळे जमिनीतील उपलब्ध ओलावा वाढला असून अनेक भागांतील पिकाची स्थिती सुधारत आहे.सध्या सोयाबीन पीक फुलोरा ते शेंगा धरणे व शेंगा भरणे या महत्त्वाच्या अवस्थेत असल्याने या काळात पिकाची नियमित पाहणी करणे आवश्यक आहे.

पाने व शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांवर लक्ष

क्षेत्र पाहणीदरम्यान काही ठिकाणी सोयाबीनवर पाने व शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव आढळून आला.विशेषतः स्पोडोप्टेरा,हेलिकोव्हर्पा (हरभरा घाटे अळी) यांसह इतर अळ्या फुलोरा संपल्यानंतर व शेंगा विकसित होत असताना नुकसान करू शकतात.प्रादुर्भाव वाढल्यास पाने कुरतडली जाणे,शेंगांना छिद्रे पडणे आणि शेंगांतील दाण्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते.

त्यामुळे केवळ दिसेल त्या ठिकाणी फवारणी न करता पिकाची नियमित पाहणी करून प्रादुर्भावाची तीव्रता लक्षात घेऊन व्यवस्थापन करावे.

प्रादुर्भाव आढळल्यास कृषी विभाग किंवा कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार योग्य कीटकनाशकाची निवड करावी. एमामेक्टीन बेन्झोएट,कॉराजन, टाकुमी किंवा इतर शिफारशीत कीटकनाशकांचा वापर संबंधित कीटक,पिकाची अवस्था आणि मंजूर लेबल क्लेमनुसारच करावा.

कीटकनाशकाची शिफारस केलेली मात्रा,पाण्याचे प्रमाण,प्रतीक्षा कालावधी आणि सुरक्षिततेच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. एकाच रासायनिक गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळून फेरपालट करावी.तसेच अंधाधुंदपणे किंवा एकापेक्षा अधिक कीटकनाशके एकत्र मिसळून फवारणी करू नये.

पिवळा मोझेकसदृश लक्षणांवर विशेष लक्ष

जिल्ह्यातील काही भागांत सोयाबीनवर पिवळा मोझेकसदृश लक्षणे दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी. पानांवर अनियमित हिरवे-पिवळे चट्टे,नवीन पानांवर मोझेकसदृश नमुना,पानांचा काही भाग पिवळसर होणे,झाडांची वाढ खुंटणे किंवा गंभीर प्रादुर्भावात पानांची विकृती आढळल्यास पिवळा मोझेक रोगाची शक्यता तपासावी.पिवळा मोझेक हा विषाणूजन्य रोग असल्याने बाधित झाड थेट औषधाने बरे करता येत नाही.त्यामुळे रोगाचा प्रसार रोखणे हे व्यवस्थापनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.या रोगाच्या प्रसारात पांढरी माशी महत्त्वाचा वाहक कीटक आहे.पावसाचा दीर्घ खंड,उष्ण आणि तुलनेने कोरडे हवामान पांढऱ्या माशीच्या वाढीस पोषक ठरू शकते.

बाधित झाडे शेताबाहेर नष्ट करा

रोगाचा प्रसार कमी करण्यासाठी शेतातील तसेच बांधावरील तणांचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. काही तण व इतर यजमान वनस्पतींवर विषाणू तसेच वाहक कीटक टिकून राहू शकतात. त्यामुळे अनावश्यक तण, स्वयंउगवलेली पिके तसेच रोगग्रस्त किंवा संशयित वनस्पतींचे योग्य व्यवस्थापन करावे.पिवळा मोझेकसदृश लक्षणे असलेली बाधित झाडे सावधगिरीने उपटून शेताबाहेर नेऊन नष्ट करावीत.ती झाडे शेतात किंवा बांधावर टाकू नयेत.बाधित वनस्पती शेतात राहिल्यास रोगाचा स्रोत कायम राहण्याची आणि पांढऱ्या माशीमार्फत रोगाचा पुढील प्रसार होण्याची शक्यता वाढते. पुढील हंगामात सोयाबीनची वेळेवर पेरणी करणे आणि बिगरहंगामी लागवड टाळणेही महत्त्वाचे आहे.

पांढऱ्या माशीचे एकात्मिक व्यवस्थापन आवश्यक

पिवळा मोझेकसदृश रोगाचा प्रसार रोखण्यासाठी पांढऱ्या माशीचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. पिकाची नियमित पाहणी करून विशेषतः पानांच्या खालच्या बाजूस पांढऱ्या माशीची उपस्थिती तपासावी. निरीक्षणासाठी पिवळे चिकट सापळे वापरावेत.प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपर्यंत पोहोचल्यास कृषी विभागाच्या शिफारशीनुसार योग्य कीटकनाशकाचा वापर करावा.

रसशोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी थायामेथोक्झाम किंवा इतर शिफारशीत कीटकनाशकांचा वापर संबंधित पिकासाठी मंजूर लेबल क्लेम, शिफारस केलेली मात्रा आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच करावा.अनावश्यक व वारंवार फवारणी टाळावी.फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी, मधमाश्या व इतर उपयुक्त कीटकांचा कमी वावर असताना करणे अधिक योग्य ठरते.पानांचा पिवळसरपणा म्हणजे नेहमी मोझेक नव्हे सोयाबीनच्या पानांवर पिवळसरपणा दिसला म्हणजे प्रत्येक वेळी तो पिवळा मोझेक रोगच आहे,असे गृहीत धरू नये.

अन्नद्रव्यांची कमतरता, जमिनीतील ओलाव्याची कमतरता किंवा जास्तीची ओल,मुळांशी संबंधित समस्या,बुरशीजन्य रोग, किडींचा प्रादुर्भाव तसेच अन्य ताणामुळेही पानांचा पिवळसरपणा दिसू शकतो.त्यामुळे केवळ लक्षणे दिसताच महागडी औषधे फवारण्याऐवजी पिकाची संपूर्ण स्थिती,रोगाची लक्षणे,किडींची उपस्थिती,जमिनीतील ओलावा आणि इतर कारणांचा विचार करून कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अचूक निदान करावे.

ओलाव्याच्या ताणात अन्नद्रव्य व्यवस्थापन

ज्या भागांत पावसाचा खंड कायम आहे आणि पिकावर ओलाव्याच्या ताणाची लक्षणे दिसत आहेत,तेथे पिकाच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे.शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनानुसार १३:००:४५ या विद्राव्य खताची १०० ग्रॅम मात्रा १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करता येते.यामुळे ताण व्यवस्थापनास आणि अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेस मदत होऊ शकते.

मात्र,फवारणीपूर्वी पिकाची अवस्था,उपलब्ध ओलावा आणि हवामानाची स्थिती लक्षात घ्यावी. पावसाची शक्यता असताना किंवा तीव्र उन्हात फवारणी टाळावी. कोणत्याही खताची किंवा कीटकनाशकाची शिफारशीपेक्षा अधिक मात्रा वापरू नये.पुढील काळात पाऊस व आर्द्रतेच्या परिस्थितीनुसार बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पिकाची नियमित पाहणी करावी.रोगाची लक्षणे आढळल्यास अचूक निदान करून कृषी विभाग व कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार योग्य बुरशीनाशकाचा वापर करावा.रोगाची खात्री नसताना अंदाजाने किंवा प्रतिबंधात्मक स्वरूपात वारंवार फवारणी टाळावी. आवश्यकतेनुसार ट्रायकोडर्मा, जैविक घटक आणि शिफारशीत रासायनिक बुरशीनाशकांचा एकात्मिक पद्धतीने वापर करावा.

ऐकीव माहितीवरून फवारणी टाळा

पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता परिस्थितीनुसार वैज्ञानिक पद्धतीने पीक व्यवस्थापन करावे.सोयाबीनमध्ये हिरवे-पिवळे चट्टे,मोझेकसदृश लक्षणे,वाढ खुंटणे,पाने कुरतडणे, शेंगांना छिद्रे पडणे,पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव किंवा इतर असामान्य लक्षणे आढळल्यास तातडीने कृषी विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.

स्वतःहून किंवा ऐकीव माहितीच्या आधारे कीटकनाशकांचे मिश्रण करून फवारणी करू नये.कृषी विभाग व कृषी विद्यापीठाच्या शिफारशी, पिकाची अवस्था, प्रादुर्भावाची तीव्रता आणि औषधाचे लेबल क्लेम यानुसारच फवारणी करावी.सोयाबीन पिकाची नियमित पाहणी, रोग-किडींचे वेळीच निदान, पांढऱ्या माशीचे एकात्मिक व्यवस्थापन आणि पावसाच्या खंडातृ तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे,असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande