ठाणे - राष्ट्रवादी ( श.प) ची क्लस्टर कार्यालयावर धडक
ठाणे, 27 ऑगस्ट (हिं.स.)। नुकत्याच झालेल्या ठामपाच्या सर्वसाधारण सभेमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबविण्यासाठी क्लस्टर विकास कंपनी स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या कंपनी म्हणजे तैनाती फौज असल्याचा आरोप करीत कंपनीच्या हातातील क्लस्
राष्ट्रवादी ( श.प) ची क्लस्टर कार्यालयावर धडक


ठाणे, 27 ऑगस्ट (हिं.स.)। नुकत्याच झालेल्या ठामपाच्या सर्वसाधारण सभेमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबविण्यासाठी क्लस्टर विकास कंपनी स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या कंपनी म्हणजे तैनाती फौज असल्याचा आरोप करीत कंपनीच्या हातातील क्लस्टरचा कारभार काढून घ्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली तीन हात नाका ते क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यालय असा विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो ठाणेकर सहभागी झाले होते. याप्रसंगी डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी उपायुक्त दीपक झिंझाड यांचा जोरदार समाचार घेतला.

क्लस्टरच्या अंमलबजावणीचे कंत्राट क्लस्टर विकास कंपनीस देण्याच्या ठरावास राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षासह सत्तेत सहभागी असलेल्या भाजपनेही विरोध केला आहे. मात्र, राक्षसी बहुमताच्या जोरावर हा ठराव पारित करण्यात आला आहे. या ठरावामुळे ठाणे शहरातील विकासात्मक धोरणे ठरविण्याचा अधिकार ठामपाऐवजी कंपनीला मिळणार असल्याचा आरोप करीत हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चेकऱ्यांनी हातात क्लस्टर कंपनीचा निषेध करणारे फलक घेतले होते. तीन हात नाका येथून सुरू झालेला हा मोर्चाचा क्लस्टर कार्यालयावर समारोप करण्यात आला.

यावेळी डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले, आज ठाण्याला पाणी मिळत नाही. रस्त्यांवर ट्रॅफिक कसा आहे, तुम्हाला माहितीये. नगरसेवक निधीत कपात केली अन् 130 कोटी रुपये त्या कंपनीला दिलेत. म्हणजे काहीही करून पैसे जमवायचे. हा प्रकार गेले अनेक वर्षे ठाण्यात चालू आहे. मेट्रो, रिंग रेल्वे, काय रस्ते, अरे कशासाठी? एका प्रोजेक्टमध्ये तीन-तीन हजार झाडं कापतायत. ठाण्यामध्ये कधी एवढी उष्णता होती का आधी? त्यामुळे ठाण्याचं वाटोळं करण्याचा डाव आहे . क्लस्टरच्या माध्यमातून एक महत्त्वाचा मुद्दा यातून लक्षात आला की ५०% मालकी हक्क नसताना काही लोक जातात आणि सहमती पत्र दिले जातात, हे कोणत्या अधिकारावर दिले जातात? गोर गरिबांचं तोंड दाबूनच टाकायचंय का तुम्हाला? अनेकदा घरे रिकामी करण्यासाठी तिथे लोकं जातात ते महानगरपालिकेचे कर्मचारी आहोत, असे भासवतात. त्यांच्याकडे खोटे ओळखपत्र असतात. म्हणजेच जे जंतर-मंतरवर दिसलं ना, लाठीमार करताना ते कोण फालतू गुंड आले होते, पोलिसांच्या मध्ये उभे राहून तेच लाठ्या मारत होते, अशी परिस्थिती ठाण्यामध्ये सुरु आहे, असेही डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.

या प्रसंगी प्रधान यांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांना भारतीय संविधानाच्या ७४ व्या घटनादुरुस्ती कायदा, १९९२ नुसार कलम २४३-डब्ल्यू अन्वये दिलेल्या अधिकारांचा भंग केला आहे, असा आरोप करून ठाणे शहरात चार हजार एकरांवर क्लस्टरचं डेव्हलपमेंट होत आहे. आज या ठाणे शहरात तीस एमएलडी पाणी टंचाई आहे.

पावसाळ्यातही ठाण्यात अनेक ठिकाणी टँकरने पाणी चालू आहे. असे असताना बाराचा एफएसआय देऊन चार हजार एकर डेव्हलप करून ठाण्याला विकायला काढलंय आणि त्याचा विरोध करायला राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकं या ठिकाणी आले आहेत. क्लस्टरसाठी एक एसपीव्ही तयार झालेली आहे. त्या कंपनीबद्दल कोणाला काही माहीत नाही, पण त्या कंपनीच्या मार्फत हे क्लस्टर डेव्हलपमेंट होणार आहे. आमचा या कंपनीला विरोध आहे. महासभेच्या ज्या हक्क आहेत ते काढून एका कंपनीला देण्याचा हा डाव आहे. पण ठाण्याच्या नागरिकांनी डोळे बंद करून ऐकून घ्यायचं हे दिवस आता संपलेत. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल. सर्वात कहर म्हणजे, ठाणे महानगरपालिकेने 130 कोटी रुपये या क्लस्टरला दिले, तो खर्च कशावर झाला? आणि दिला कशाला? आणि पैसे का दिले? आज ठाण्यातल्या गरीब लोकांचे 12% आणि 20% प्रॉपर्टी टॅक्स वाढवताय आणि असे 130 कोटी रुपये तुम्ही एका क्लस्टरच्या एका प्रायव्हेट कंपनीला देता? या कंपनीत कोण आहे; त्यांची नावे जाहीर करा, याच्या मागे कोण आहे? आम्ही 12 चा एफएसआय तुम्हाला घेऊन देणार नाही. गरिबांना घर मिळालेच पाहिजे, पण गरीब राहिले बाजूला आणि हे बिल्डरच्या सगळं घशात घालत आहेत. आपल्या आवडीचा बिल्डर आणायचा. त्याच्याशी आधी सेटलमेंट करायचं आणि मग त्याला द्यायचं, असा डाव आहे, अशी टीका केली.

या मोर्चात कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, युवक अध्यक्ष तथा गटनेते अभिजीत पवार, महिलाध्यक्ष मनिषाताई भगत, विरोधी पक्ष नेते शानू पठाण, मुंब्रा प्रभाग समिती सभापती दिपाली भगत, नगरसेवक यासीन कुरेशी, प्रकाश बर्डे, सुधीर भगत, महिला कार्याध्यक्षा फुलबानो पटेल, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, श्रीकांत भाईर, सरचिटणीस राजेश साटम, विरू वाघमारे, मिलींद बनकर, मकसूद खान, सुरेंद्र उपाध्याय, शमीम खान, बुद्धभूषण गोटे, जगत सिंह, सचिन पंधेरे, कुलविंद, सिंह, मेहरबान पटेल, एकनाथ जाधव, कृणाल भोईर, पद्माकर पाटील, बिपीन गेहलोत ,समाधान माने, उमेश अग्रवाल, पुजा शिंदे, माधुरी सोनार, आसिम शेख, प्रदीप साटम, राजू चापले, वैभव विचारे, विशांत गायकवाड, शुभम द्विवेदी, संदीप ढकोलिया, राकेश भगत, रत्नेश दुबे, ज्ञानेश्वर राजपंखे, मुलीम खान, निलेश सावंत, गजानन चौधरी, दिलीप नाईक, राजु शिंदे, राहू पाटील, संतोष साटम, मनिषा पाटील, दिपाली गावंड, दिलीप उपाडे, पप्पू अस्थाना, शेखर भालेराव, किशारे फुपाणे, संदिप येताळ, विश्वास चव्हाण, सहभागी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande