रायगडच्या राजकारणात महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
दळवींच्या ‘लोकसभेवर भगवा’ वक्तव्याला अनिकेत तटकरेंचे जोरदार प्रत्युत्तर रायगड, २७ ऑगस्ट (हिं.स.) : रायगडच्या राजकारणात महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी आगामी काळात रायगड लोकसभा मतदा
New conflict in Raigad politics; Aniket Tatkare hits back at Dalvi's statement.


दळवींच्या ‘लोकसभेवर भगवा’ वक्तव्याला अनिकेत तटकरेंचे जोरदार प्रत्युत्तर

रायगड, २७ ऑगस्ट (हिं.स.) : रायगडच्या राजकारणात महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी आगामी काळात रायगड लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. त्यांच्या या वक्तव्याला आमदार अनिकेत तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत दळवींना त्यांच्या पूर्वीच्या राजकीय सहकार्याची आठवण करून दिली.

महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत हा पक्ष सातत्याने खोडा घालण्याचे काम करतो, असा आरोप केला होता. तसेच भाजप आणि शिवसेनेचे विचार जुळत असल्याचे सांगत रायगडमध्ये तिन्ही पक्षांच्या एकत्रित राजकारणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दरम्यान, कर्जत येथील एका कार्यक्रमानंतर प्रतिक्रिया देताना अनिकेत तटकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात महेंद्र दळवी यांनी मदतीसाठी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे किती वेळा फेऱ्या मारल्या, याची माहिती असल्याचा दावा केला. तसेच जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पत्नी मानसी दळवी यांना अध्यक्षपद मिळावे, यासाठीही दळवींनी तटकरे यांच्याकडे मदत मागितल्याचा दावा त्यांनी केला.

‘राजकीय गरज असताना मदत मागायची आणि त्यानंतर त्याच व्यक्तीवर टीका करायची, ही भूमिका कितपत योग्य?’ असा सवाल अनिकेत तटकरेंनी उपस्थित केला.

त्यामुळे महेंद्र दळवी यांच्या ‘लोकसभेवर भगवा’ या घोषणेपेक्षा ‘कालची साथ आणि आजचा विरोध’ हा मुद्दा सध्या रायगडच्या राजकारणात अधिक चर्चेचा विषय ठरला आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघर्षाची शक्यता

विधानसभा निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांनी एकमेकांना साथ दिली होती. त्यामुळे आज आरोप-प्रत्यारोप करताना कालच्या राजकीय सहकार्याचा इतिहासही लक्षात ठेवावा, अशी भूमिका तटकरे गटाकडून मांडली जात आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महेंद्र दळवी आणि तटकरे गटातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, महायुतीतील अंतर्गत समीकरणांकडे रायगडच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande