अर्भकांच्या मृत्यूचे गलिच्छ राजकारण नको; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याचा निषेध – खासदार डॉ. अनिल बोंडे
अमरावती, 27 ऑगस्ट (हिं.स.)। सर्वत्र वचवच बोलणाऱ्या सुषमा अंधारे यांनी जिल्हा महिला रुग्णालयातील नवजात अर्भकांच्या आयसीयूला लागलेल्या आगेत तीन अर्भकांचा मृत्यू होण्याच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या अत्यंत दुर्दैवी घटनेचे केविलवाणे व गलिच्छ राजकारण सुरु
“अर्भकांच्या मृत्यूचे गलिच्छ राजकारण नको; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याचा निषेध” – खासदार डॉ. अनिल बोंडे


अमरावती, 27 ऑगस्ट (हिं.स.)।

सर्वत्र वचवच बोलणाऱ्या सुषमा अंधारे यांनी जिल्हा महिला रुग्णालयातील नवजात अर्भकांच्या आयसीयूला लागलेल्या आगेत तीन अर्भकांचा मृत्यू होण्याच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या अत्यंत दुर्दैवी घटनेचे केविलवाणे व गलिच्छ राजकारण सुरु केले असून त्यांच्या वक्तव्यांचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया भाजपाचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी दिली आहे.

आज आयोजित पत्रकार परिषदेत खासदार डॉ. अनिल बोंडे बोलत होते.

यावेळी आ. प्रवीण पोटे पाटील, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, किरण पातूरकर, चेतन पवार प्रामुख्याने उपस्थित होते. काल सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. त्यावर उत्तर देताना खासदार डॉ. अनिल बोंडे बोलत होते.

जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी सामान्य भाजीपाला विकणारे लोक देखील यूपीआय म्हणजे कॅशलेस व्यवहार करतील अशी अपेक्षा व्यक्त केली तेव्हा माजी मंत्री पी चिदंबरम यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. कॉंग्रेसजनांनी व विरोधकांनी या धोरणावर टीका केली होती. आज यूपीआय द्वारे व्यवहार रूढ झाला आहे. या निर्णयाच्या दशकपूर्ती निमित्त रस्त्याच्या कडेला पाणीपुरी विकणारा सामान्य विक्रेता देखील यूपीआय वापरतो, हे दर्शवण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाणीपुरी खाऊन त्याच्याशी कॅशलेस व्यवहार केला. यावर टीका हास्यास्पद आहे. केवळ सनसनाटी उभी करणे हा त्यांचा उद्देश होता. आरोग्य आयुक्तांच्या तोंडाला काळे फासून बातम्या खेचण्याचा त्यांचा उद्देश होता. उद्धव ठाकरे यांनी अशा वाचाळ अंधारेना संवेदनशील ठिकाणी पाठवू नये असे डॉ. बोंडे यांनी स्पष्ट केले.

डॉ. बोंडे पुढे म्हणाले, 24 ऑगस्टला पहाटे ही दुर्घटना घडली तेव्हा पहाटे पाच वाजे पासूनच पालकमंत्री अमरावती जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात होते. क्षणाक्षणाला त्यांनी प्रशासनाला युद्धस्तरावर हालचाली करण्याचे निर्देश दिले. या अपघातातील सहा नवजात अर्भके खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. सोबतच रुग्णालयातील उर्वरित 30 बाळांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे व त्यांच्यावर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी तात्काळ दिले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहाटे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य सचिव यांच्याशी संवाद साधला. या प्रकरणी अपघाताची चौकशी करणे, काही घातपात आहे का याचा तपास करणे, मृत नवजात बालकांच्या कुटुंबियांना निकषानुसार शासकीय मदत करणे आणि पुन्हा अशा प्रकारची घटना घडणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था उभी करणे, अशा सर्व सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या क्षणी दिल्या आहेत. या दुर्दैवी घटनास्थळाला भेट देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य सचिव यांनी तात्काळ पोहचण्याची व्यवस्था पालकमंत्र्यांनीच केली. शासनाकडून घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून यात कोणी दोषी आढल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे देखील पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे प्रकरण अतिशय गंभीरतेने घेतले असल्याचे डॉ बोंडे म्हणाले.

भाजपाने स्वतःची अधिकृत दहीहंडी रद्द केली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याचे कौतुक केले. आता आमचे नाव अमरावतीत अन्य कोणीही आपल्या उपक्रमाला लावू नये किंवा वापरू नये अशी आमची जाहीर सूचना असल्याचे ही भाजपच्या वतीने सांगण्यात आले.

-------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande