
महसुली अर्धन्यायिक प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याचा शासनाचा उपक्रम
रायगड, २७ ऑगस्ट (हिं.स.) : समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत न्याय आणि हक्क पोहोचविणे हे क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या विचारांचे मूळ सूत्र होते. शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेले कार्यही अमिट आहे. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून महसूल विभागांतर्गत प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे जलदगतीने आणि तडजोडीने निकाली काढण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत महसुली अर्धन्यायिक प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनीशी संबंधित महसुली दावे मोठ्या प्रमाणावर दाखल होतात. एखाद्या प्रकरणात एका स्तरावर निकाल लागल्यानंतर असंतुष्ट पक्षकारांकडून वरिष्ठ न्यायालयात अपील किंवा पुनरीक्षण अर्ज दाखल केला जातो. त्यामुळे अनेक दावे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात.
विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या लोक अदालतच्या धर्तीवर दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आणि तडजोडीने हे महसुली दावे कायमस्वरूपी निकाली काढण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे. त्यामुळे अर्धन्यायिक यंत्रणेवरील प्रलंबित प्रकरणांचा ताण कमी होण्यास मदत होणार असून, पक्षकारांचा वेळ आणि खर्चही वाचणार आहे.
महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करून नागरिकांना अधिक सुलभ, गतिमान आणि परिणामकारक न्याय मिळवून देणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)