
रत्नागिरी, 27 ऑगस्ट, (हिं.स.) । जिल्ह्यातील बेकायदा वाळू वाहतूक, महसूलचे दुर्लक्ष आणि नंबर प्लेट नसलेल्या वाहनांच्या गैरवापराबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची गंभीर दखल घेत उपप्रादेशिक परिवहन विभागाने धडक कारवाई करून दीड कोटीहून अधिक दंडाची वसुली केली आहे. विभागाच्या वायुवेग पथकामार्फत नियमित तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जात असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिली.
एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या वर्षभरात ४,९७२ वाहनांची तपासणी करण्यात आली. यात क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेल्याने दोषी आढळलेल्या ३५५ वाहनांकडून तब्बल १ कोटी १३ लाख ५९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एप्रिल २०२६ ते जुलै या गेल्या चार महिन्यांत २,२७४ वाहनांची तपासणी झाली असून दोषी ठरलेल्या १९२ वाहनांकडून ३५ लाख ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या तपासणी केलेल्या काळात विनानंबर प्लेट ५,८४४ वाहनांपैकी १८३ दोषी वाहनांकडून १ लाख ८८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एप्रिल ते जुलै या काळात १,०७५ वाहनांची तपासणी करून दोषी आढळलेल्या १४७ वाहनांकडून ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
केवळ दंडात्मक कारवाईवर न थांबता, सर्व वाहतूकदारांनी रस्ते व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे यासाठी विभागामार्फत सातत्याने जनजागृती व प्रबोधन मोहीमही राबवण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी