
परभणी, 27 ऑगस्ट (हिं.स.)। येत्या ३० ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काही पक्षप्रवेश होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर परभणी महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)च्या नगरसेवकांच्या पक्षांतराच्या चर्चांना नगरसेवकांनी पूर्णविराम दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही महापालिका सदस्य अन्य पक्षात प्रवेश करणार नसल्याची ठाम भूमिका नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत मांडली.
“आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेतील महायुतीचा घटक असताना आम्हाला दुसऱ्या पक्षात जाण्याची गरजच काय?” असा सवाल नगरसेवकांनी केला. काही राष्ट्रवादी नेते व कार्यकर्ते पक्षांतर करत असल्यामुळे अथवा जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात असल्यामुळे या चर्चा सुरू झाल्या असाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जिल्ह्यातील आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वावर आपला ठाम विश्वास असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. महायुतीतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मनपात सकारात्मक भूमिका कायम ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ असून कोणताही पक्षप्रवेश करणार नसल्याचे नगरसेवकांनी निर्विवादपणे जाहीर केले. या पत्रकार परिषदेला नगरसेवक अबुल कलीम अहमद, शेख अ. नईम, अक्षय देशमुख, आकाश लहाने, इमरान खान, नदीम काझी, वसीम कबाडी, अर्जुन सामाले, फहाद शालीमार, बाळासाहेब बुलबुले, विजय जामकर आणि अखील काझी आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis