


रायगड, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। गणेशोत्सव काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी वीज, पाणी, वाहतूक आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचे काटेकोर नियोजन करावे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध होईल, अशी यंत्रणा सज्ज ठेवावी. तसेच दहीहंडीच्या आयोजनासाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना पूर्ण झाल्याशिवाय परवानगी देऊ नये, असे निर्देश पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिले.
जिल्हा नियोजन भवनात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांची माहिती देणारे दिशादर्शक फलक लावावेत. इंदापूर, माणगाव, लोणेरे, पोलादपूर आदी ठिकाणी वाहतूक मार्गदर्शनाची व्यवस्था करावी. वाहन बिघाड झाल्यास ते तातडीने बाजूला करण्यासाठी क्रेन आणि प्रवाशांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात. वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांसाठी पाणी व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही गोगावले यांनी दिल्या.
आदिती तटकरे यांनी शांतता समितीच्या सदस्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन तातडीने पूर्ण करून ओळखपत्रे देण्याच्या सूचना केल्या. स्थानिक खासगी रेस्क्यू टीम्सशी समन्वय साधून त्यांची मदत आपत्कालीन परिस्थितीत उपलब्ध करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले. वाहतूक कोंडीच्या ठिकाणी सुविधा केंद्रे वाढवून तात्पुरती सार्वजनिक शौचालये उभारण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. दहीहंडीच्या परवानगीसाठी सेफ्टी बेल्टसह आवश्यक सुरक्षा साधनांची पूर्तता अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले.
गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी ७ पोलीस उपनिरीक्षक, १२८ पोलीस अधिकारी, १,९०० पोलीस अंमलदार, ४०० होमगार्ड आणि एसआरपीएफची एक कंपनी तैनात करण्यात येणार आहे. महामार्गावर २५ मोटारसायकल, २० टोईंग क्रेन आणि २० रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
खारपाडा, खारेपाटण, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड, महाड एमआयडीसी आणि पोलादपूर येथे सुविधा केंद्रे उभारण्यात येणार असून येथे पाणी, वैद्यकीय व पोलीस मदत कक्ष, महिला-बालकांसाठी सुविधा आणि वाहनांसाठी आवश्यक सेवा उपलब्ध राहणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)