
सर्वपक्षीय नेत्यांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन
अमरावती, 27 ऑगस्ट (हिं.स.)।
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना २०२६ अंतर्गत शेतकऱ्यांना कोणत्याही जाचक व शेतकरीविरोधी अटी-शर्ती न लावता थेट सरकारी तिजोरीतून दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी तिवसा तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून आंदोलन केले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. तसेच पावसाअभावी निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता तिवसा तालुका तातडीने कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.तिवसा येथील पेट्रोल पंप चौकात शेतकरी आणि विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर मोर्चाने तहसील कार्यालय गाठले. कार्यालयासमोरही घोषणाबाजी करत विविध नेत्यांनी सरकारच्या कर्जमाफी धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
निवेदनात म्हटले आहे की, निसर्गाची अवकृपा, अस्मानी-सुलतानी संकटे आणि वाढत्या आर्थिक अडचणींमुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. मागील खरीप हंगामातील नुकसानीची भरपाई अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. मिळालेल्या तुटपुंज्या मदतीतून उसनवारीची परतफेड करणेही शक्य झाले नसल्याचा आरोप करण्यात आला. यंदाच्या खरीप हंगामासाठी अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून तसेच घरातील वस्तू विकून खर्च केला. मात्र, मागील दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली असून किडीचा प्रादुर्भावही वाढला आहे.सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे दिलासा मिळेल, अशी अपेक्षा असताना वन टाइम सेटलमेंट (ओटीएस) पद्धतीबाबत शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. ओटीएसमुळे भविष्यातील आर्थिक पत आणि कर्ज मिळण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ नये, यासाठी सरकारने स्पष्ट हमी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांऐवजी दोन लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान, आयटीआरधारक व जुन्या कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांचा समावेश, मृत शेतकऱ्यांच्या कायदेशीर वारसांना लाभ आणि सिबिल स्कोअरचे संरक्षण या प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
मागण्या तातडीने मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सर्वपक्षीय नेत्यांनी दिला. आंदोलनात प्रशांत कांबळे, अनिल थुल, वैभव वानखडे, श्रीराम देशमुख, प्रकाश सोनोने, सागर भवते, विश्वजीत बाकडे, रितेश पांडव यांच्यासह शेकडो शेतकरी व नागरिक सहभागी झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी