
रत्नागिरी, 27 ऑगस्ट (हिं.स.) । महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी सिंधुरत्न समृद्धी योजनेची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन माजी आमदार तथा सिंधुरत्न समितीचे उपाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी केले.
योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी रत्नागिरी (दक्षिण)च्या वतीने राजापूर येथे तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. राजापूरच्या भाजपा कार्यालयात हा मेळावा झाला. योजनेच्या माध्यमातून कोकणातील विविध घटकांना उपलब्ध होणाऱ्या योजनांची माहिती कार्यकर्त्यांना देण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ. नातू यांनी योजनेअंतर्गत पर्यटन, मत्स्यव्यवसाय, बचत गट, कृषी तसेच विविध वैयक्तिक लाभाच्या आणि नावीन्यपूर्ण योजनांची सविस्तर माहिती दिली. शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावागावांत जाऊन जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
कोकणातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, मत्स्य व्यावसायिक, बचत गट तसेच पर्यटन क्षेत्राशी संबंधित घटकांना योजनांची माहिती मिळणे आणि त्यांना योग्य पद्धतीने अर्ज करता येणे आवश्यक आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी शासनाच्या योजनांचा अभ्यास करून जनतेला मार्गदर्शन करावे, असे डॉ. नातू यांनी सांगितले.
यावेळी कार्यकर्त्यांनी विविध योजनांबाबत विचारलेल्या प्रश्नांना डॉ. नातू यांनी उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले. शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्याचा प्रत्यक्ष लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संघटितपणे काम करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
बैठकीस राजापूर तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंधुरत्न समृद्धी योजनेच्या प्रभावी जनजागृतीसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी